संगणकाचा भरभराटीचा काळ म्हणजे १९५७ ते ७४. या काळात संगणकाच्या क्षमतेत आणि वेगात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संशोधनाचा वेग वाढला.
डार्टमथ कॉन्फरन्सनंतर १९५८ साली फ्रँक रोजेनबॅट यांनी मेंदूंच्या चेतापेशींवर आधारित कृत्रिम न्यूरल नेटवर्क ‘परसेप्ट्रॉन’ तयार केले. हे वस्तूंचे वर्गीकरण करू शकत असे. यंत्र अनुभवातून शिकून स्वत:मध्ये सुधारणा करू शकते, हे परसेप्ट्रॉनने दाखवून दिले.
१९६१ साली ‘युनिमेट’ नावाचा पहिला औद्योगिक रोबॉट जॉर्ज डेव्होल यांनी तयार केला. जनरल मोटरच्या असेंब्ली लाइनमध्ये तो वापरत. १९६४ साली ‘एलिझा- १’ ही पहिली चॅटबॉट जोसेफ वाईजेनबॉम यांनी तयार केली. कॉम्प्युटर चॅटच्या माध्यमातून संवाद करू लागला. १९७२ साली स्टॅन्फर्ड विद्यापीठात ‘मायसिन’ नावाची एक्स्पर्ट सिस्टीम टेड शॉर्टलिफ यांनी तयार केली. रक्तातील जंतू- संसर्गाचे निदान आणि उपचार ती करू शकत असे.
मात्र अपेक्षित यश न मिळाल्यामुळे १९७४ ते १९८० या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) पीछेहाट झाली. या क्षेत्रात त्याला पहिला ‘एआय िवटर’ म्हणतात. सरकारी अनुदानाला कात्री लागली. खासगी गुंतवणूकही आटली.
१९८१ मध्ये जपान सरकारने ८५० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करून ‘फिफ्थ जनरेशन कॉम्प्युटर्स’चा प्रकल्प सुरू केला. अमेरिकेने ‘स्ट्रॅटेजिक कॉम्प्युटिंग इनिशिएटिव्ह’ हा भव्य प्रकल्प सुरू केला. कृत्रिम बुद्धिमत्तेला पुन्हा सुगीचे दिवस आले. १९८० ते १९८७ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा दुसरा भरभराटीचा काळ म्हणता येईल.
१९८० नंतर संगणकामध्ये, एक्सपर्ट सिस्टीममध्ये आणखी सुधारणा झाल्या. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला चांगले दिवस आले. पण ही सिस्टीम फार महागडी होती. १९८६ साली ‘नेटटॉक’ प्रणाली तयार झाली. संगणक बोलून संवाद साधू लागला. पुढे १९९२ साली जपानचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळण्यात आला! त्याला अपेक्षित यश मिळाले नव्हते. अमेरिकेचाही प्रकल्प थांबला, १९९३ साली. पुन्हा या क्षेत्राची पीछेहाट सुरू झाली. १९८७ ते १९९३ हा ‘दुसरा एआय विंटर’.
१९९७ साली एक भारी गोष्ट घडली! जगात या कृत्रिम बुद्धीचे नाव दुमदुमले. आयबीएम कंपनीच्या डीप ब्ल्यू संगणकाने त्या वेळचा जगज्जेता गॅरी कॅस्पारोव्ह याला बुद्धिबळाच्या खेळात हरवले! मानवी बुद्धीपेक्षा संगणकीय बुद्धी वरचढ ठरली. सगळय़ा जगाचे लक्ष या घटनेने वेधून घेतले. या क्षेत्राकडे पुन्हा गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला!
– बिपीन देशमाने,मराठी विज्ञान परिषद