कोट्यवधी वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या सजीवांचे अवशेष आपल्याला खडकांमधे आढळतात. त्यांना आपण जीवाश्म म्हणतो. सामान्यत: अशा अवशेषांमधे शंख आणि शिंपल्यांसारख्या प्राण्यांच्या अंगावरचे कवच, पृष्ठवंशीय (व्हर्टेब्रेट) प्राण्यांची हाडे आणि दात, झाडांचे अश्मीभूत खोड, यांसारख्या सजीवांच्या शरीरातल्या कठीण पदार्थांचा समावेश असतो. हे सारे जीवाश्म अतिप्राचीन काळातल्या सजीवांच्या शरीराचा भाग होते, म्हणून त्यांचा उल्लेख कधी कधी ‘कायिक जीवाश्म’ (बॉडी फॉसिल) म्हणून केला जातो. जीवाश्मांचा आणखीही एक प्रकार आहे. त्यांना लेशजीवावशेष (ट्रेस फॉसिल) किंवा पदाचिन्ह जीवाश्म (इक्नोफॉसिल) म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी मागे हटते, तेव्हा काही ठिकाणी पुळणीवरची ओली वाळू, तर काही ठिकाणी दलदल उघडी पडते. तिथे शंखधारी किंवा शिंपलाधारी प्राणी वाळूवरून अथवा चिखलावरून जाताना दिसतात. ते तसे गेले की त्यांच्या मार्गक्रमणाचा माग तिथे उमटतो. खेकड्यांनी केलेली बिळेही आपल्या दृष्टीस पडतात. सागरी संधिपाद प्राणी (आर्थ्रोपोडा) त्या ओल्या चिखलावरून चालत गेल्यामुळे त्यांच्या पायाचे ठसे तिथे उमटतात.

हेही वाचा >>> कुतूहल : हिमालयाची निर्मिती

आणखी थोडे पुढे म्हणजे समुद्र जिथे उथळ आहे तिथे आपण गेलो, तर तळाशी सतत गाळ साठत असतो. पोहू न शकणाऱ्या विविध जातींच्या असंख्य सागरी जलचर प्राण्यांचा अधिवास तळाशी साठत राहणाऱ्या या गाळातच असतो. अशा प्राण्यांचे सारे आयुष्य त्या गाळातच व्यतीत होते. निरनिराळ्या प्राण्यांची वर्दळ त्या गाळात अखंड सुरू असते. भूवैज्ञानिक परिभाषेत गाळाला अवसाद (सेडिमेंट) म्हणतात. अवसादात असणारे जैव पदार्थांचे कण हेच त्या साऱ्या सजीवांचे अन्न असते.

साहजिकच या प्राण्यांना अन्नाच्या कणांच्या शोधात याच अवसादातून फिरावे लागते. एखादा भक्षक त्यांना गिळंकृत करण्यासाठी आला, की काही जण अवसादातच खोल घुसून आपला बचाव करतात. तर काही जण त्या गाळावरूनच जिवाच्या आकांताने पळ काढत शत्रूला हुलकावणी देतात. एखाद्याला विसावा घ्यायचा असेल तर तो प्राणी गाळावरच काही क्षण टेकतो. काही जातींचे सजीव याच गाळात बिळे करून राहतात. अवसाद ओला असल्याने साहजिकच या सर्व हालचालींच्या खाणाखुणा त्या अवसादात उमटत राहतात. कोट्यवधी वर्षांपूर्वी जे प्राणी अस्तित्वात होते, त्यांनी त्या प्राचीन काळी केलेल्या हालचालींच्या खाणाखुणांचे जतन अनेक ठिकाणच्या खडकांमध्ये व्यवस्थितपणे झालेले आढळते. कारण कालांतराने हे अवसाद वर उचलले जाऊन जमिनीचा भाग बनतात, तेव्हा अवसादांचे रूपांतर खडकात होते आणि खाणाखुणांचे रूपांतर लेशजीवावशेषांमध्ये होते.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal fossil evidence for the history of life on earth zws