गुजरात राज्यातल्या कच्छमध्ये सुमारे ४.७ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय सर्पाचे अवशेष नुकतेच सापडले. हे जीवाश्म पाणंद्रो येथील लिग्नाइटच्या, म्हणजे हलक्या दर्जाच्या कोळशाच्या खाणीत मिळाले. सुमारे १५ मीटर लांबी असणाऱ्या या सापाचे २७ मणके मिळाले. प्रत्येक मणका ६ सेंमी लांबीचा आणि ११ सेंमी रुंदीचा आहे. यातले काही मणके सुटे, तर काही मणके एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत मिळाले.

कच्छमध्ये साडेचार कोटी वर्षांपासून ते अर्धा कोटी वर्षांपूर्वीपर्यंत सतत होणाऱ्या सागरी अतिक्रमणामुळे काही अवसादी पाषाण समूहांची निर्मिती (सेडिमेंटरी रॉक फॉर्मेशन्स) होत होती. गेल्या शतकात या पाषाणप्रस्तरांमधून काही सागरी पृष्ठवंशीय प्राण्यांच्या जीवाश्मांच्या अस्तित्वांचे शोध लागले होते. त्यामुळे इथल्या पाषाणांमध्ये देवमासा किंवा अन्य काही पृष्ठवंशीय प्राण्यांच्या जीवाश्मांचा शोध घेण्याचे काम रुडकी येथील भारतीय प्रौद्याोगिकी संस्थानातले (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- आयआयटी) संशोधक २००५ पासून करत होते. त्या गटातल्या संशोधकांना या महासर्पाच्या अवशेषांचा शोध लागला.

या महासर्पाला वैज्ञानिक नाव द्यायच्या वेळी हिंदू पुराणांतील वासुकी या सर्पाच्या नावावरून या १५ मीटर लांबी असणाऱ्या महासर्पाचे नाव ‘वासुकी इंडिकस’ असे ठेवण्यात आले आहे. त्यातले ‘वासुकी’ हे नाव प्रजातीचे आहे, तर इंडिकस हे नाव जातीचे असून ते या सापांचे जीवाश्म भारतात मिळाले, असे दर्शवते.

सुरुवातीला हे मणके एखाद्या मगरीच्या पूर्वजाचे असावेत असे वाटले होते. पण मिळालेल्या अवशेषांचा अधिक बारकाईने अभ्यास केला असता ते एखाद्या सर्पाचेच आहेत हे लक्षात आले. मणक्यांच्या मोजमापावरून या विलुप्त (एक्स्टिन्क्ट) झालेल्या सापाची लांबी किती असावी याचा शोध घ्यायची पद्धत असते. ती वापरून या सापाची लांबी अकरा ते सव्वापंधरा मीटर इतकी प्रचंड असावी, असा निष्कर्ष निघतो.

वासुकी इंडिकस हा साप पाणसाप नसावा, त्याच्या मणक्यांची रचना ही जलचर सापांच्या मणक्याप्रमाणे नसून भूचर सापांच्या मणक्याप्रमाणे आहे. पण तो पाण्याच्या जवळ राहात असावा असे या जीवाश्मांवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचा निष्कर्ष आहे. कारण ज्या अवसादांमध्ये या सर्पाचे अवशेष मिळाले, ते ज्या पाणथळ जागेत अजगरांसारखे जाडजूड साप कधी कधी जातात, त्याच प्रकारच्या पाणथळ जागेत तयार झालेले अवसादी पाषाण आहेत!