समस्या सोडवता येणे हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा तिसरा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मनुष्याप्रमाणे, दिलेला प्रश्न किंवा समोर आलेली समस्या सोडवू शकतील अशा संगणक आज्ञावली (प्रोग्राम) तयार करणे हा कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाचा गाभा आहे. तरी विविध प्रकारच्या समस्या सोडवता येणे ही कृत्रिम बुद्धिमत्तेची ‘शलाका चाचणी’ (ॲसिड टेस्ट) मानली जाते.
समस्येबाबत समुचित विदा (डेटा) किंवा माहिती दिल्यास तिचे योग्य विश्लेषण करून उत्तर काढणे हा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेला अवलंबवावा लागतो. त्यासाठी विकसित केलेल्या अनेक विशिष्ट पद्धती (अल्गोरिदम) तिच्या संग्रही ठेवल्या जातात. त्यांचा वापर करून समस्येचे मूळ जाणून घेऊन उत्तर काढणे अशी प्रक्रिया ती करते. या रीतीने प्राथमिक स्तराची कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली जाते. तिच्या पुढची पायरी असते की मुळात कुठली माहिती किंवा आकडेवारी समोरच्या समस्येसाठी पाहिजे हे जाणून घेणे आणि ती मिळवणे. त्याशिवाय विश्लेषणासाठी अधिक कार्यक्षम पद्धती विकसित करणे आणि तिचे प्रशिक्षण देणे या प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रगत करावे लागते.
हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचे पायाभूत घटक : कारणमीमांसेचा विकास
संगणक किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता तिचा प्रचंड वेग, अविरत कार्य करणे आणि खात्रीलायक अचूकता यांच्या बळावर दिलेल्या समस्येसाठी सर्व पर्यायांची यादी करून इष्टतम उत्तर काढण्याची पद्धत (सर्च मेथड) वापरून पुढे जाऊ शकते. मात्र प्रत्येक प्रश्नासाठी हे धोरण उपयोगी नसून अनेकदा तर नवे पर्याय निर्माण करणे हेच उत्तर असते!
कळीची बाब अशी आहे की प्रत्यक्षात कित्येक समस्या अशा असतात ज्यांच्यासाठी कार्यक्षम गणिती पद्धती विकसित करणे शक्य नाही. त्या वेळी आपली बुद्धी उत्तरासाठी वेगळे मार्ग चोखाळते. उदाहरणार्थ, ती नवगामी किंवा स्वयंशोध (ह्युरीस्टिक) पद्धत वापरून समाधान काढते. अनेकदा प्रश्नाला रूपांतरित करून त्याच्या उत्तराने मूळ प्रश्नाचे उत्तर काढणे असेही केले जाते. काही वेळा चुकत-माकत (ट्रायल अँड एरर) अशा रीतीनेही आपण उत्तराकडे जातो. या पद्धतींना औपचारिकपणे कृत्रिम बुद्धिमत्तेत समाविष्ट करणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. त्यावर तोडगा म्हणून संगणक आधारित अनुरूपण पद्धतीचा (सिम्युलेशन) वापर करण्यावर भर असतो.
काही समस्यांत कल शोधून किंवा तुलना करून उत्तर मिळू शकते. तरी अशा बहुढंगी पद्धती कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये समाविष्ट करून तिला मानवी बुद्धीच्या जवळ आणण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत.
– डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल: office@mavipa.org
संकेतस्थळ: http://www.mavipa.org