बिरबल साहनी जगद्विख्यात वनस्पतीवैज्ञानिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय वनस्पतींचे जीवाश्म हा असल्याने वनस्पतीविज्ञान आणि भूविज्ञान या दोन्ही विज्ञानशाखांमधे त्यांना गती होती. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८९१ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या भैरो या गावी झाला. रसायनविज्ञानाचे प्राध्यापक असणारे त्यांचे वडील रुचिराम साहनी वृत्तीने चौकस होते. निसर्गाच्या अभ्यासासाठी भटकंती करताना छोट्या बिरबलला ते बरोबर घेऊन जात. या भटकंतीत बिरबल वनस्पतींचे आणि पाषाणांचे नमुने गोळा करत असत. त्यामुळे लहान वयातच त्यांना निसर्ग निरीक्षणाची गोडी लागली.
त्यांनी लाहोर विद्यापीठाची पदवी आणि लंडन विद्यापीठाची वनस्पतीविज्ञानातील स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ख्यातनाम वनस्पतीवैज्ञानिक डॉ. आल्बर्ट चार्ल्स स्यूअर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लंडन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. प्रा. लॉसन यांनी लिहिलेले वनस्पतीविज्ञानाचे पाठ्यपुस्तक त्या सुमारास नावाजलेले होते. पण काळानुरूप त्यात काही सुधारणा करणे गरजेचे होते. डॉ. स्यूअर्ड यांनी ते काम मोठ्या विश्वासाने साहनी यांच्याकडे सोपवले. त्या पाठ्यपुस्तकाचे पुनर्लेखन यथार्थपणे करून तो विश्वास किती सार्थ होता हे साहनी यांनी दाखवून दिले.
झारखंड राज्यातील राजमहाल टेकड्यांच्या खडकांमधल्या वनस्पतींच्या जीवाश्मांवरच्या त्यांच्या सखोल संशोधनातून ज्या काळात ते खडक निर्माण झाले, त्या प्राचीन काळात इथल्या वनस्पतींमधे किती विविधता होती हे समजले. त्या वनस्पतीपैकी पेंटोझायली नावाच्या वनस्पतीसमूहाने तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले. ज्या काळात राजमहाल टेकड्यांमधले खडक निर्माण झाले, त्याच काळामधे ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका इथे निर्माण झालेल्या खडकांमधे कालांतराने पेंटोझायली समूहातल्या वनस्पतींचे जीवाश्म मिळाले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, भारतीय द्वीपकल्प, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे पाच खंड पूर्वी एकाच महाखंडाचे भाग होते, या सिद्धांताला पुष्टी मिळाली. पुढे पेंटोझायली समूह हा सपुष्प वनस्पतींच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे हे निष्पन्न झाले. त्यामुळे साहनी यांच्या या संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले.
लखनऊ विद्यापीठ १९२१ मध्ये स्थापन झाल्यानंतर तिथल्या वनस्पतीविज्ञान विभागाची धुरा साहनी यांच्याकडे सोपविण्यात आली. आपल्या विभागाची गुणवत्ता तर त्यांनी उत्कृष्ट ठेवलीच; पण १९४२ मध्ये त्यांच्याच प्रयत्नांमुळे लखनऊ विद्यापीठात भूविज्ञान विभाग सुरू झाला. १९४६ मध्ये त्यांनी पुराजीवविज्ञान संस्था सुरू केली होती, ती एका खोलीत. आज ती जागतिक कीर्तीची संस्था झाली असून तिचे नाव आता ‘बिरबल साहनी पुराविज्ञान संस्था’ असे करण्यात आलेले आहे. १० एप्रिल, १९४९ रोजी त्यांचे निधन झाले.
– प्रा. रंजन गर्गेमराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org