स्वयंचलित वाहने ही वाहनचालकांच्या नोकऱ्या घालवतील असे म्हणतात, त्या प्रमाणे भविष्यातील ह्यूमनॉइड आपल्या सर्व नोकऱ्या घेतील का, अशी भीती असली तरी तसे होणार नाही. यंत्रवत असणारी कामे ह्यूमनॉइडच्या ताब्यात जातील आणि आपल्या कामांचे स्वरूप बदलेल. त्यानुसार नवीन रोजगार आणि बाजारपेठाही उपलब्ध होत आहेत. त्यासाठी आपल्याला नवनवीन शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असेल. भविष्यातील ह्यूमनॉइडबरोबर मानवी सहजीवन कसे असावे याबद्दल सध्या लोकांना प्रशिक्षण देण्यात येऊ लागले आहे.
हेही वाचा >>> कुतूहल : भविष्यातील कार्यक्षम आणि बुद्धिमान ह्यूमनॉइड
ह्यूमनॉइड मानवाप्रमाणे दिसू लागला तरीही, मानव आणि ह्यूमनॉइड यांना एकत्र काम करण्यासाठी त्यांच्यामध्ये सुव्यवस्थित संभाषण होणे खूप महत्वाचे आहे. कारण संभाषण हा एक मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. यासाठी भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच ह्यूमनॉइडमध्ये संज्ञानात्मक आणि विश्लेषणात्मक विचारक्षमता येणे हा एक महत्वाचा टप्पा असेल. भावनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (इमोशनल एआय) म्हणून ओळखले जाणारे प्रभावी संगणन, मानव व ह्यूमनॉइड यांचा भावनात्मक परस्परसंवाद सुधारण्यासाठी, संगणकशास्त्र, मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स यांचा एकत्र वापर करते. ह्यूमनॉइडना मानवांसोबत वावरताना, तात्काळ आपल्या भावना ओळखण्यास, समजून घेण्यास आणि प्रतिसाद देण्यास तयार करते. कदाचित भविष्यात, भावनिक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला स्मार्टफोन किंवा ह्यूमनॉइड फक्त आवाजावरून किंवा लिखाणावरून मूड ओळखेल आणि त्याप्रमाणे तुमच्यासाठी बरे वाटावे म्हणून काही संगीत सुरू करेल.
हेही वाचा >>> कुतूहल: प्रगत हयूमनॉइड
ह्यूमनॉइडना माणसासारखे सामान्यज्ञान यावे यासाठी, ओपन एआय आणि गुगल डीप माईंडसारख्या अनेक कंपन्या त्यांच्यामध्ये अष्टपैलू शैक्षणिक अल्गोरिदम (व्हर्साटाइल लर्निंग अल्गोरिदम) वापरण्यावर काम करत आहेत. त्यामुळे, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण आणि यंत्रमानवशास्त्र एकत्र करून, मानवी आकलनशक्तीची नक्कल करणाऱ्या ह्यूमनॉइडची प्रणाली तयार करण्यात येत आहे. यात समजणे, शिकणे, स्मरणशक्ती, तर्कसंगत कारणमीमांसा, माहितीचे पद्धतशीर मूल्यमापन, वस्तूंची ओळख करणे आणि निर्णय घेणे यासारख्या मानसिक कार्यांचा समावेश होतो. या पुढील काळात ह्यूमनॉइडची चिकित्सक विचारसरणीमध्ये प्रगती होईल, मग भविष्यात रोनाल्डो आणि मेस्सी सारखा फुटबॉल खेळणारा अष्टपैलू ह्यूमनॉइड निर्माण झाला नाही तरच नवल!
पण भविष्यातील स्वयंजागरूक ह्यूमनॉइड माणसाचे सर्व आदेश ऐकतील का? माणसाप्रमाणे त्यांनाही काही बंधने असतील का? मानवाचे आणि ह्यूमनॉइडचे सहअस्तित्व एकमेकांना पूरक कसे होईल? हे ज्वलंत प्रश्न अनेकांच्या मनात घर करून आहेत.गौरी सागर दशेापांडे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
सकेंतस्थळ: http://www.mavipa.org
© The Indian Express (P) Ltd