सुरुवातीच्या संगणकीय प्रारूपांची (मॉडेल्सची) रचना आपला मेंदू आणि मज्जातंतू कसे काम करतात त्यांच्या समजावर आधारित होती. सर्जनशील जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालींमध्ये अशाच प्रारूपांचा वापर होत असला तरी त्यात एक महत्त्वाचा बदल आढळतो. प्रारूपांना पुरवलेल्या माहितीत सुरुवातीला काही चुकीची उदाहरणे असली तरीही त्यांची उत्तरे चुकीच्या दिशेने जाऊ नयेत म्हणून त्यात उंदीर- मांजराच्या खेळाप्रमाणे असलेली प्रतिस्पर्ध्यात्मक प्रारूपे वापरली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्पना करा की एक प्रारूप एका विशिष्ट कलावंताच्या शैलीत चित्र काढण्याच्या प्रयत्नात आहे, तर विरोधी प्रारूप बनावट चित्रे ओळखणारा एक कला समीक्षक आहे. ‘समीक्षक’ बनावट ओळखू शकणार नाही अशी चित्रे ‘कलावंत’ काढू पाहतो, तर ‘समीक्षक’ जास्त वास्तववादी शैलीतील बनावट चित्रेसुद्धा ओळखू पाहतो. या चढाओढीत कालांतराने ‘कलावंत’ इतका चांगला होतो की त्याची चित्रे  मूळ चित्रांइतकीच खरी भासतात.

हेही वाचा >>> कुतूहल: चॅटजीपीटीच्या समस्या

तंत्रज्ञानाच्या जगात, हे ‘कलावंत’ प्रत्यक्षाशी मिळतेजुळते नवे आविष्कार (प्रतिमा, आवाज किंवा मजकूर) निर्माण करण्यास शिकतात, तर ‘समीक्षक’ खऱ्या आणि निर्मित आविष्कारांमधील फरक ओळखण्यास शिकतात. त्यामुळे आवश्यक असलेले उदाहरणांचे भरघोस संच मिळतात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालींमध्ये अमाप सुधारणा होऊ शकते. ‘धिस-परसन-डज-नॉट-एक्झिस्ट’ मध्ये अशा प्रारूपाचा रंजक उपयोग केला आहे. कल्पना करा की आपण एक फोटो अल्बम बघत आहात, परंतु प्रत्येक पृष्ठावरील वास्तववादी छबी खऱ्या व्यक्तींची नसून पूर्णपणे संगणकाने तयार केलेली आहे. यात सुरुवात लोकांच्या चित्रांपासून झाली पण होता होता ‘कलावंताने’ जास्तीत जास्त वास्तववादी पण पूर्णत: निर्मित चित्रे बनवली. सोबतचे चित्र असेच एक उदाहरण आहे.

हेही वाचा >>> कुतूहल: चॅट जीपीटीचे आगमन

सर्जनशील प्रसार प्रारूपांचे (डिफ्यूजन मॉडेल्सचे) कार्य वेगळयाच प्रकारे चालते. ज्याप्रमाणे एखादा मूर्तिकार दगडातून नको तो भाग काढून मूर्ती घडवतो थोडेफार तसेच. कल्पना करा की आपल्याला एका मांजराचे चित्र काढायचे आहे. सुरुवातीला कोऱ्या कॅन्व्हासवर यादृच्छिक (रॅन्डम) रंग पसरवायचे. प्रत्येक टप्प्यावर, गणितीय सूत्रांच्या मार्गदर्शनाखाली त्यातून जे मांजरासारखे नाही ते दूर करत जायचे आणि जे मांजरासारखे आहे ते सुधारत जायचे. कालांतराने, प्रत्येक टप्प्यावर, प्रतिमा अधिक स्पष्ट आणि मांजरासारखी होत जाते आणि शेवटी मिळते मांजराचे एक सुंदर चित्र. हे चेटूक असल्यासारखे भासेल पण प्रत्यक्षात ही आहे प्रारूपांची वारेमाप उदाहरणांपासून शिकण्याची उच्च क्षमता. शिल्पकाराप्रमाणे हे ज्ञान मग यादृच्छिकतेतून एका अर्थपूर्ण निर्मितीस मार्गदर्शक ठरते. 

– आशिष महाबळ

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal generative artificial intelligence and art zws
Show comments