चंद्रावर गेलेल्या शेवटच्या मोहिमेतले, प्रत्यक्ष चांद्रभूमीवर पाऊल ठेवलेले एक चांद्रवीर वैज्ञानिक आहेत. त्यांचे नाव आहे हॅरिसन श्मिट आणि त्यांचा विषय आहे भूविज्ञान. हॅरिसन श्मिट यांचा जन्म न्यू मेक्सिको येथे ३ जुलै १९३५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्था (कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), ओस्लो विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ येथे झाले. नॉर्वेमधल्या एक्लोगाइट नावाच्या खडकांचा पाषाणविज्ञान (पेट्रॉलॉजी) आणि सांरचनिकी (स्ट्रक्चरल जिऑलॉजी) या शाखांच्या दृष्टिकोनांतून अभ्यास करून १९६४ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून श्मिट यांनी भूविज्ञान विषयात डॉक्टरेट (पीएच.डी.) प्राप्त केली. श्मिट हे चंद्रावर जाणारी बारावी व्यक्ती होत. चंद्रावर जाणारे ते केवळ पहिलेच नव्हे, तर एकुलते एक भूवैज्ञानिक आहेत.

‘अपोलो १७’ ही चांद्रमोहीम ७ डिसेंबर १९७२ ते १९ डिसेंबर १९७२ या कालावधीत हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत श्मिट यांच्याकडे चंद्रावर उतरून सफर करण्यासाठी अवकाशयानासोबत नेलेल्या चांद्रबग्गीच्या (ल्यूनर मोड्यूल) चालकाचे काम होते. त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर एकूण ३६ किलोमीटर इतका प्रवास केला. हा आतापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर केलेला सर्वात जास्त प्रवास आहे. त्यांचे सहकारी जीन सर्नन यांच्यासमवेत चांद्रबग्गीतून उतरून ते थोडेसे पायी फिरलेसुद्धा! त्यांनी तिथे विविध प्रयोग केले. दोघांनी मिळून चंद्रावर २२ तास संशोधन केले. चंद्रावरील खंडकांचे अनेक नमुने आणि केशरी रंगाची माती गोळा केली. चंद्रावर ३.६ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून ती तयार झाली होती. त्याची विज्ञानजगतात खूप चर्चा झाली.

मानवाला चंद्रावर घेऊन जाणारी ‘अपोलो १७’ ही अखेरची मोहीम होती. ती १२ दिवस, १३ तास, ५१ मिनिटे चालली होती. या मोहिमेद्वारे चंद्रावरून विविध खंडकांचे ११० किलो वजनाचे नमुने पृथ्वीवर आणले.

हॅरिसन श्मिट यांनी ‘अपोलो १७’ मोहिमेनंतर नासा या अवकाश संशोधन संस्थेत १९७३पर्यंत विविध पदांवर काम केले आहे. त्यानंतर काही काळ ते विस्कॉन्सिन विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होते.

पुढे १९७६ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या सिनेटच्या निवडणुकीत ते उभे राहिले आणि सिनेटर म्हणून निवडून आले. नंतर श्मिट यांनी अनेक लोकप्रिय नियातकालिकांमधून आपल्या चांद्रयान मोहिमेविषयी लेखन केले. चांद्रमोहिमांच्या उद्दिष्टांविषयी आणि फलिताविषयी विवेचन करणारे त्यांचे ‘रिटर्न टु द मून’ (चंद्राकडे परतीचा प्रवास) हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झाले.

सैनिकी पार्श्वभूमी नसूनही चंद्रावर जाणारा पहिला वैज्ञानिक, आणि त्यातही भूवैज्ञानिक म्हणून डॉ. हॅरिसन श्मिट यांचे नाव नेहमीच घेतले जाईल.

डॉ. अभिजीत जयसिंगराव पाटील मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader