मानवी जीवनातली अतिशय विलोभनीय गोष्ट कोणती असेल तर ती आहे झ्र संवाद! माणसांना एकमेकांबरोबर संवाद साधणे आवडते. गेल्या काही दशकांतल्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे जगाचा आकार आकुंचन पावला आहे. त्यामुळे संवाद साधण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. आज एकमेकांपासून हजारो मैल लांब असणारे लोक घरबसल्या समाज- माध्यमांमुळे एकमेकांशी विनासायास संवाद साधू शकतात, आपले विचार मांडू शकतात. इथे कोणा एकाची मक्तेदारी नाही. समाज- माध्यमांवर कोणीही, कधीही बेधडकपणे व्यक्त होऊ शकते. समाज- माध्यमांना कसलीही सेन्सॉरशिप (बहुतेकदा) लागू होत नाही. पण यामुळेच समाज- माध्यमांची प्रत बरीचशी खालावते.

गेल्या काही वर्षांत समाज-माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो आहे. त्यामुळे समाज- माध्यमांचा दर्जा नि:संशय वाढला आहे. बऱ्याचशा समाज-माध्यमांमध्ये ‘नैसर्गिक भाषा संवर्धन (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग)’ हे साधन वापरून भडक आणि आक्षेपार्ह मजकूर सौम्य केला जातो किंवा नाहीसा केला जातो. याला ‘ एआय फिल्टर’ असं म्हटलं जातं.

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकातील फरक

समाज-माध्यमांवर आढळणारी आणखी एक त्रासदायक गोष्ट म्हणजे संपादित केलेली (एडिटेड) छायाचित्रे आणि चित्रफिती! ही संपादित केलेली छायाचित्रे आणि चित्रफिती अतिशय अस्सल वाटतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ती आयुष्यातून उठवू शकतात. संपादित छायाचित्रे आणि चित्रफिती ओळखून त्यांना नाहीसे करणेसुद्धा ‘एआय फिल्टर’मुळे शक्य झालं आहे.

समाज-माध्यमांवरच्या ‘बातम्या’ ही एक निराळीच डोकेदुखी आहे. बऱ्याचदा या बातम्या खोट्या आणि सत्याचा विपर्यास करणाऱ्या असतात; यांना ‘फेक न्यूज’ म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी एक बातमी जगभरात पसरली होती. ती म्हणजे, ‘डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हावेत यासाठी पोप फ्रान्सिस यांनी पाठिंबा दिला…’ समाज-माध्यमांमुळे ही बातमी क्षणार्धात सर्वदूर वेगाने पोहोचली. खरे तर ही एक ‘फेक न्यूज’ होती. या बातमीची शहानिशा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केली गेली होती. समाज माध्यमांवरच्या अशा अनेक ‘फेक न्यूज’ आज कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शोधल्या जातात आणि नाहीशा केल्या जातात.

‘निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता’ वापरून मनोहारी, कलापूर्ण, छायाचित्रे आणि चित्रफिती अत्यंत कमी वेळात तयार केल्या जातात. यामुळे एक कल्पनातीत असा अनुभव आपण घेऊ शकतो. समाज- माध्यमांमध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे आज संपूर्ण जगाचे परिप्रेक्ष्यच बदलून गेले आहे यात शंकाच नाही.

डॉ माधवी ठाकूरदेसाई

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org