सागरी कासवांविषयी जाणीवजागृती व्हावी यासाठी जगभरात १६ जून हा दिवस ‘जागतिक सागरी कासव दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी आठ टन प्लास्टिक समुद्रात कसेही फेकण्याच्या मानवाच्या निष्काळजी कृतीमुळे सागरी कासवांना सर्वात जास्त धोका निर्माण झाला आहे. या कासवांचे प्रमुख अन्न जेलिफिश हे असते. सागरी पाण्यातील वाहत आलेल्या पिशव्या आणि जेलिफिश यातील फरक त्यांना समाजत नाही. अशा प्लास्टिक पिशव्या घशात अडकून त्यांचा मृत्यू होतो.
आठापैकी सहा सागरी कासवांच्या प्रजाती अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय किनारी प्रदेशांत केले जाणारे बांधकाम, प्रदूषकांचे वाढते प्रमाण, मासेमारीच्या जाळय़ात अनवधानाने झालेली धरपकड आणि मांसासाठी पकडली जाणारी सागरी कासवे या बाबी कासवांच्या जिवावर उठल्या आहेत. कासवांच्या अंडी घालण्याच्या पद्धतीमुळेही त्यांचे जीवन धोक्यात येते. मादी कासवे बहुधा रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी अंडी देण्यासाठी वाळूच्या किनाऱ्यांवर येतात. घरटय़ासाठी योग्य जागा शोधल्यावर मादी आपल्या पश्चबाहूंच्या साहाय्याने (फ्लिपर्सने) वाळूत खड्डा खणून त्यात अंडी घालते व तो पुन्हा वाळूने भरून समुद्राच्या दिशेने निघून जाते. ५०-६० दिवसांच्या उबवणीच्या कालावधीनंतर अंडय़ांतून पिल्ले बाहेर येतात व समुद्राच्या दिशेला जातात. काही वर्षांनी मादी कासवे साधारणत: त्यांचा जन्म झालेल्या ठिकाणीच अंडी देण्यासाठी परत येतात. नर कासवे कधीच किनाऱ्यांवर येत नाहीत. चिपळूणजवळ वेळास आणि ओरिसाच्या किनाऱ्यावर सागरी कासवे दरवर्षी अंडी घालण्यासाठी येतात.
सागरी कासवांच्या जीवशास्त्राचे जनक आणि सागरी कासव संवर्धन करणाऱ्या फ्लोरिडा येथील संस्थेचे संस्थापक डॉ. आर्ची कार यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी १६ जून हा दिवस ‘सागरी कासव दिन’ म्हणून साजरा केला जातो, तर २३ मे रोजी सर्व प्रकारच्या कासवांच्या रक्षणार्थ ‘जागतिक कासव दिन’ साजरा केला जातो.
१६ जून या दिवशी लोकसहभागातून कासवांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी जनजागृती केली जाते. ज्या किनाऱ्यांवर कासवे अंडी देण्यासाठी येतात ते स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावेत. तिथे रात्री अंधार असू द्यावा. अंडी घालणाऱ्या मादी कासवांना, घरटय़ाला, पिल्लांना त्रास देऊ नये. जखमी कासव दिसल्यास वन विभागाला कळवावे. पशुवैद्यकांची मदत घ्यावी. मच्छीमारांनी फाटलेली जाळी समुद्रात टाकू नयेत. जाळय़ात अडकलेल्या कासवांना जीवदान द्यावे. या कूर्मावतारांसाठी सजग राहणे हे आपले कर्तव्य आहे.
– हर्षल कर्वे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org