आंतरराष्ट्रीय वन दिवस प्रतिवर्षी २१ मार्चला साजरा होतो. वृक्ष हा जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा मानवी कल्याणासाठी असणारा उपयोग, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली त्याचबरोबर आदिम जमातीची त्यावरील उपजीविकता आणि जैवविविधता या सर्वाचे आपणास ज्ञान मिळावे आणि त्याचा उपयोग करून आपण जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षण करावे या एका उद्देशामधून संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून पृथ्वीवरील सर्व लहान-मोठय़ा सदस्य राष्ट्रांना तळागाळापर्यंत जाऊन साजरा करण्याचे सुचविले आणि प्रत्यक्षामध्ये आणलेसुद्धा. जागतिक वन दिन साजरा करण्यामध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचासुद्धा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्रातर्फे वन दिवसासाठी एक घोषवाक्य जाहीर केले जाते आणि नंतर वर्षभर त्या घोषवाक्यावर कृतिशील कार्य करून जगभरात वन संवर्धनाच्या शिक्षणाचे कार्य केले जाते आणि दिलेल्या वाक्यानुसार कार्याचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी, अडचणी समजून पुढील वर्षांत त्या सोडवण्यावर भर दिला जातो. या वर्षीच्या २१ मार्च २०२२ या जागतिक वन दिवसाचे घोषवाक्य आहे ‘‘शाश्वत वननिर्मिती आणि त्याचा योग्य वापर’’. वनांची निर्मिती शाश्वत आणि कायम असावी आणि त्यामधून जैवविविधता समृद्ध व्हावी हा या घोष वाक्याचा साधा सरळ अर्थ आहे.

२१ मार्च हा जागतिक वन दिवस लोकसहभागामधून साजरा व्हावा, यामध्ये शाळा, महाविद्यालयामधील युवकांचा सहभाग वाढावा, या दिवशी मोठय़ा प्रमाणावर मोकळया, सुरक्षित आणि वृक्षासाठी योग्य अशा जागेवर सामूहिक वृक्षारोपण करावे ही अपेक्षा असते पण त्याचबरोबर वृक्षारोपण हे फक्त समाजसेवा म्हणून न करता त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणेही आवश्यक असावे. हिवाळ्यात जमिनीमध्ये ओलावा असताना ३१३१३ फूट आकाराचा खोल खड्डा, त्यात पालापाचोळा, शेणखत आणि नंतर दोन वर्षांचे वृक्षबाळ तेथे लावले असता त्याचा सहसा मृत्यू होत नाही. वृक्षारोपणात दोन झाडांमधील अंतर कमीत कमी १५ फूट असावे. जे वृक्षारोपणात सहभागी होतात त्या सर्वाना त्यांनी लावलेल्या वृक्षाचे नाव, त्याचा आपल्याला, समाजाला आणि जैवविविधतेस होणारा फायदा, त्याची काळजी कशी घ्यावी याचे शिक्षणसुद्धा घेणे आवश्यक आहे. २१ मार्च हा वन दिन असला तरी तो वृक्ष सन्मानाचा दिवस आहे याचा विसर पडता कामा नये.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org