कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर संशोधन करणाऱ्या एका अग्रगण्य अमेरिकन संस्थेचे नाव आहे ‘ओपन एआय’. सॅन फ्रान्सिस्को येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेची स्थापना डिसेंबर २०१५ मध्ये झाली. सहसंस्थापक असलेले सॅम ऑल्टमन हे या संस्थेचे सीईओ- मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. संस्थेचे ध्येय आहे- सुरक्षित आणि फायदेशीर व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणे. अर्थात, आर्थिकदृष्ट्या अतिशय मौल्यवान कामात मानवांना मागे टाकणाऱ्या स्वायत्त प्रणाली तयार करणे.

‘ओपन एआय’ने उल्लेखनीय अशा मोठ्या भाषा प्रारूपांची जीपीटी मालिका, टेक्स्ट टू इमेज प्रारूपांची डॅल-ई मालिका, आणि सोरा नावाचे टेक्स्ट टू व्हीडिओ प्रारूप तयार केले आहे.

हेही वाचा >>> कुतूहल : हस्ताक्षर ओळख – वैविध्यातून शिक्षण

जीपीटी म्हणजे जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड टान्सफॉर्मर. ‘जीपीटी-३’ हे एक न्युरल नेटवर्क मशीन लर्निंग प्रारूप आहे. याला मानवी मेंदूप्रमाणे कार्य करण्यासाठी तयार करून प्रशिक्षित केले जाते. यामध्ये पाहिजे तो मजकूर (टेक्स्ट) तयार करण्यास शिकण्यासाठी शक्तिशाली भाषा प्रारूपाचा वापर होतो. ही प्रारूपे मानवाने निर्माण केलेल्या मजकुराचे विश्लेषण करतात आणि त्यावरून नवीन मजकूर तयार करत मानवाच्या प्रश्नांची उत्तरे देतात. ‘चॅटजीपीटी’ हा सध्या माणसाला हवा असलेला मजकूर तयार करण्यासाठी आणि वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार केलेला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट आहे. मोठ्या प्रमाणावरील विदेचा वापर करून प्रशिक्षित केल्यामुळे मानवाप्रमाणे तो उत्तरे आणि प्रतिसाद तयार करू शकतो.

‘डॅल-ई’ या यंत्र शिक्षण प्रारूपात नैसर्गिक भाषा प्रक्रियेचा वापर केला जातो. जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून डॅल-ई हे प्रारूप दिलेल्या वर्णनानुसार प्रतिमा तयार करू शकते. ‘ओपन एआय’चे ‘क्लिप’ हे बहुलकी (मल्टीमोडल) कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित न्युरल नेटवर्क आहे. हे मजकूर आणि प्रतिमा यांचा संबंध प्रस्थापित करू शकते. हे प्रारूप वापरून प्रतिमा वर्गीकरण, प्रतिमांना योग्य मथळे देणे यांसारखी कामे करता येतात. ‘सोरा’ हे प्रारूप दिलेल्या मजकुरावरून व्हीडिओ क्लिप तयार करते. यातही जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. संस्थेने जीपीटी-४ प्रारूपात आणखी सुधारणा करून मजकूर, प्रतिमा आणि ऑडिओ ओळखण्यासाठी वर्धितमल्टीमोडल क्षमतेसह ‘जीपीटी-४ओ’ प्रारूप बनविले जे अधिक संवादात्मक आहे.

‘ओपन एआयओ १’ हे नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूप (स्ट्रॉबेरी प्रकल्प) याचे नुकतेच संस्थेने अनावरण केले. हे प्रारूप तर्क वापरून विज्ञान, कोडिंग व गणितातील पूर्वीपेक्षा कठीण समस्या सोडवू शकते.

डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org