लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी प्रचंड विनाशकारी भूकंप झाला होता. रिश्टर श्रेणीनुसार त्याची तीव्रता ६.४२ होती. भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी गावाच्या र्नैऋत्येला ४० किमी अंतरावर होता; आणि त्याची नाभी १० किमी खोल होती. लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यांना या भूकंपाची झळ चांगलीच बसली होती.

लातूर जिल्ह्यातल्या ८१७, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३२७ खेड्यांवर या भूकंपाचा विपरीत परिणाम झाला. यांमधली ५२ खेडी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. जवळपास ११ हजार लोक मृत्युमुखी पडले होते आणि ३० हजारांहून अधिक जखमी झाले होते. इथे मातीमध्ये दगड रचून केलेली कच्ची घरे होती. त्यातून भूकंप ऐन पावसाळ्यात आणि तोही मध्यरात्री लोक झोपेत असताना झाला. त्यामुळे भूकंपात घरे कोसळून प्रचंड जीवितहानी झाली.

भारतीय द्वीपकल्प हे भूकंपदृष्ट्या सुस्थिर आहे. शिवाय हा भूकंप व्हायच्या आधीपर्यंत ज्ञात असलेल्या माहितीप्रमाणे मराठवाड्याचा हा भाग भूकंपप्रवण नव्हता. त्यामुळे इथे इतका तीव्र भूकंप होणे ही गोष्ट वैज्ञानिकांना कोड्यात टाकणारी होती. पण नंतर तिथे जे विविध भूवैज्ञानिक अभ्यास झाले त्यावरून त्या भागात कमी क्षमतेचे भूकंप आधीही होत होते आणि आताही होत असतात हे अभ्यासकांच्या लक्षात आले. म्हणून हा भाग नंतर भूकंपप्रवण ठरविण्यात आला अर्थातच हिमालय पर्वताची भूकंपप्रवणता जशी अतितीव्र आहे, तितकी किल्लारी भागाची नाही.

भारतीय द्वीपकल्पाचे पाच लाख चौरस किलोमीटर क्षेत्र ज्वालामुखीजन्य काळ्या कातळांनी बनलेल्या ‘दक्खनच्या सोपानस्तरां’नी (डेक्कन ट्रॅप) व्यापले आहे. त्याच्या आग्नेयेकडच्या भागात लातूर जिल्हा येतो. तिथे भूगर्भात खोलवर, काळ्या कातळांच्या खाली पुरातन खडक आहेत. त्यामध्ये एखाद्या ठिकाणी क्षीण क्षेत्र असले पाहिजे. भारतीय द्वीपकल्प अजूनही उत्तरेकडे मंदगतीने सरकत असून, हिमालयाची उंचीही मंदगतीने वाढत आहे. या हालचालींच्या प्रक्रियेतील एखाद्या घटनेचा धक्का इथल्या भूगर्भातल्या क्षीण क्षेत्राला बसून हा भूकंप झाला असावा, असे अनुमान निघते.

इथल्या तेरणा नदीवर बांधलेल्या धरणात १९७० पासून पाणी साठवायला सुरुवात झाली होती. या धरणातल्या जलसाठ्याचा भार तिथल्या खडकांना न झेपल्याने भूकंप झाला, आणि म्हणून या भूकंपाकडे ‘जलाशय प्रेरित भूकंपनाह्णचे (रिझर्व्हायर इंड्यूस्ड साईस्मॉसिटी) एक उदाहरण म्हणून पहावे, असेही काही तज्ज्ञांचे मत होते. पण हे फार मोठे धरण नसल्याने या मताला फारसा दुजोरा मिळाला नाही.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader