करंडक (डायाटम) प्लवकाची पेशी डबीसारखी असते. या प्रजातीत अलैंगिक प्रजनन होते. प्रत्येक प्रजननानंतर पेशी लहान होत जाते. करंडक सजीव डायाटमची जीवाश्मे मिळत नाहीत. पेशीत असलेल्या सिलिकाचे विघटन होत नसल्याने ते अनेक थरांमध्ये करंडकीय मृदेच्या स्वरूपात महासागराच्या तळाशी जमा होतात. करंडक सजीवाचे अनेक उपयोग आहेत. पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी, औषधांमध्ये आणि रंगांमध्येही हे सजीव वापरले जातात.
करंडक सजीव जैवसूचक असल्याचे आढळले आहे. पाण्यातील पोषक घटक वाढले की यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होऊन ‘अल्गल ब्लूम’ निर्माण होतात. त्यांच्यातील जैविक विष पाण्यात उतरते आणि सागरातील जलचर आणि ते जलचर खाणाऱ्यांना विषबाधेचा त्रास होतो. करंडक सजीवांची संख्या अधिक वाढल्याने त्यांचाही मृत्यू होतो. ते सर्व सागराच्या तळाशी जातात. तेथे विघटन करणाऱ्या जिवाणूंची क्रिया सुरू होते त्यामुळे येथील ऑक्सिजनचे प्रमाण घटते. त्या भागातील प्राणी ऑक्सिजनअभावी गुदमरून मरतात आणि त्या भागात एक मृत म्हणजे वठलेला पट्टा तयार होतो.
करंडक सजीव आणि प्रवाळांमध्ये सहजीवन दिसून येते. प्रवाळ बेटांमध्ये यांचे प्रमाण अधिक असते. १० टक्क्यांहून करंडक सजीव कोष करून राहतात. वातावरण प्रतिकूल असेल तर अनुकूल परिस्थिती येईपर्यंत ते सुप्तावस्थेत राहू शकतात. या स्थितीतच ते उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात प्रिकॅम्ब्रियन युगात डायनोफ्लॅजेलेट कोष रूपात असल्याची नोंद आहे.
काही ठिकाणी रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये चकचकीत उजेड दिसून येतो ज्यास ‘जीवदीप्ती’ म्हणतात. निळा हिरवा प्रकाश देणाऱ्या जीवदीप्ती असलेल्या द्विकाशाभिक सजीवांच्या सुमारे १८ प्रजाती आहेत, उदा. नॉकटील्यूका. काही यांत्रिक कारणांमुळे जसे की बोट चालवणे, पोहणे किंवा लाटांमुळे उत्तेजित झाल्यामुळे ०.१ सेकंद निळा प्रकाश चमकून जातो. पाण्यात हे द्विकाशाभिक असंख्य असल्यामुळे हा प्रकाश खुलून दिसतो. या एकपेशीय सजीवांमध्ये ल्युसिफेरीन नावाचा जैवरेणू असतो ज्याच्यामुळे ‘जीवदीप्ती’ ही अद्भुत भासणारी घटना पाहायला मिळते. ल्युसिफेरीनची ऑक्सिजनबरोबर रासायनिक क्रिया होऊन रासायनिक ऊर्जेचे प्रारणऊर्जेत रूपांतर होते आणि आपल्याला उजेड दिसतो. आपल्याकडे अंदमानला तसेच प्युएटरे रिको, फ्लोरिडा या ठिकाणी सागरात अशी जीवदीप्ती दिसून येते.
– डॉ. मंगला बोरकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org