भारतीय द्वीपकल्पामध्ये जवळपास पाच लाख चौरस किमी इतके क्षेत्र काळ्या कातळाने व्यापले आहे. काळ्या कातळांच्या पाषाणसमूहाला भूवैज्ञानिक परिभाषेत दक्खनचे सोपानप्रस्तर म्हणतात. या काळ्या कातळांच्या प्रदेशात कुठे कुठे चुनखडीचे छोटे छोटे निक्षेप (डिपॉझिट्स) तयार होतात. अर्थातच, त्यांचे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन) असते कॅल्शियम कार्बोनेट. या प्रकारच्या चुनखडीला चुनखडी टुफा (कॅल्क टुफा) म्हणतात.
चुनखडी टुफा हा गोड्या पाण्यात तयार होणारा निक्षेप आहे. सामान्यत: ज्या प्रदेशात चुनखडक आढळतो तिथे असे निक्षेप तयार होताना दिसतात. याचे कारण तिथल्या भूजलात (ग्राउंडवॉटर) कॅल्शियम कार्बोनेट विरघळते. आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भूजलात कार्बन डाय ऑक्साइड विरघळला असेल, तर भूजल आम्लधर्मी होते. तरच त्यात कॅल्शियम कार्बोनेट विरघळते, अन्यथा नाही.
तिथले कॅल्शियम कार्बोनेट विरघळलेले भूजल झऱ्यांमधून, नैसर्गिक गुहांच्या फटींतून बाहेर झिरपू लागते, किंवा छोट्या छोट्या ओढ्यांमधून वाहू लागते, तेव्हा त्यातला कार्बन डाय ऑक्साइड वायू पाण्यातून बाहेर पडतो. पाण्यात विरघळलेला वायू बाहेर पडण्याच्या या प्रक्रियेला निर्वायूकरण (डीगॅसिंग) म्हणतात. या प्रक्रियेमुळे पाण्याची कॅल्शियम कार्बोनेट विरघळवण्याची क्षमता नाहीशी होते. परिणामी विरघळलेला कॅल्शियम कार्बोनेट मुक्त होतो, आणि चुनखडी टुफा साठू लागतो.
आता जिथे चुनखडी नाही, अशा काळ्या कातळांच्या प्रदेशात चुनखडी टुफा का तयार व्हावा, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर असे आहे, की सर्व खडकांची जशी झीज होते, तशी काळ्या कातळांचीही झीज होतच असते. काळ्या कातळात असणाऱ्या काही खनिजांमध्ये कॅल्शियम असतो. जिथले हवामान शुष्क आहे, अशा अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या टापूंमधे काळ्या कातळाचे रासायनिक विघटन होऊन कॅल्शियम कार्बोनेट तयार होते, आणि भूजलात विरघळते. त्यापासून कालांतराने असे चुनखडी टुफाचे निक्षेप तयार होतात.
चुनखडी टुफा नैसर्गिक गुहांमध्ये निर्माण होतो तेव्हा गुहेच्या छतावरून खाली उतरणारे चुनखडीचे स्तंभ तयार होतात, त्यांना ‘चुनखडी झुंबर’ (स्टॅलॅक्टाइट) म्हणतात. तर गुहेच्या तळापासून वर जाणाऱ्या स्तंभांना ‘लवणस्तंभ’ (स्टॅलॅग्माइट) म्हणतात. अनेक वेळा चुनखडी झुंबर आणि लवणस्तंभ एकमेकांत मिसळतात. त्यामुळे गुहेच्या तळापासून ते छतापर्यंत चुनखडींचा ओबडधोबड खांब तयार होतो. अशा खांबांना ‘स्रावलवणस्तंभ’ (स्टॅलॅग्नेट) म्हणतात.
अनेक वेळा निक्षेप निर्माण होताना एखादे पान वाऱ्याने उडून त्यात अडकते, आणि त्यावर पुढचे निक्षेप जमा होतात. कालांतराने त्यापासून पानाचा जीवाश्म तयार होतो.
डॉ. माधुरी उके
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org