मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमतेची प्रतिकृती, यंत्रांमध्ये निर्माण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान गेल्या काही दशकांमध्ये प्रयत्नशील आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर चालणारी यंत्रे अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रिया कुशलतेने, अचूकतेने आणि वेगाने करत असल्यामुळे साहजिकच हुशार आणि चतुर वाटतात. तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेच्या (कॅपॅबिलिटी) पातळीनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तीन पातळया आहेत ‘मर्यादित, व्यापक’ आणि ‘परिपूर्ण’.

मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली, विशिष्ट कार्य उच्च-कार्यक्षमतेने करण्यासाठी निर्माण केली जाते. पूर्वनियोजित कार्य अचूकपणे करण्यावर संपूर्ण भर दिल्यामुळे प्रणालीच्या अधिक्षेत्रावर मर्यादा (डोमेन) येतात. नियमांच्या चौकटीत बांधल्यामुळे त्याव्यतिरिक्त इतर कार्य करण्यासाठी प्रणाली असमर्थ असते. उदाहरणार्थ, हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रणालीला तापमान, पावसाची शक्यता, वातावरणातील आद्र्रता सांगता येते; परंतु बसचे वेळापत्रक सांगता येणार नाही.

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जॉन सर्ल

खेळण्यात निपुण असलेली मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली, ‘जिंकणे’ हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून खेळते. मानवाप्रमाणे विचार आणि कार्य करू शकणारी बुद्धिमान यंत्रणा प्रत्येक खेळासाठी स्वतंत्रपणे तयार केली जाते. बुद्धिबळ किंवा ‘गो’सारख्या रणनीतिक खेळात संभाव्य चाल ओळखणे प्रत्येक वेळी शक्य नसते, त्यामुळे स्वत: शिकण्यासाठी समर्थ असणारी आणि परिस्थितीनुसार समस्या सोडवणारी प्रणाली आवश्यक असते. खेळाच्या गणिती तर्काची रचना अशाप्रकारे केली जाते की खेळादरम्यान प्रणाली स्वत: शिकेल. पटावरील प्रत्येक चालीचा तौलनिक विचार करून, त्याचे परिणाम लक्षात घेऊन, निष्पत्ती कशी होईल हे ठरवते. मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली स्वत:च्या तर्काने पुढची खेळी अत्यंत वेगाने ठरवते.

विशिष्ट समस्या चतुराईने सोडवण्यासाठी आणि प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी अनेक उद्योग-व्यवसाय मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करत आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात, लक्षणांवरून रोगनिदान करण्यापासून, औषधोपचार आणि शस्रक्रियेसंबंधित प्रक्रियेपर्यंत मोलाची मदत होत आहे. कारखान्यात जुळवणी साखळी (असेंब्ली लाइन) ठरवून उत्पादन प्रक्रिया स्वयंचलित केली जाते. बँक आणि वित्तीय संस्थांमधील अब्जावधींच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे, अनपेक्षित किंवा गैरव्यवहारांचा शोध घेणे यासाठी मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली सातत्याने वापरली जाते.

मनुष्याच्या हस्तक्षेपाशिवाय नियमित आणि पुनरावृत्तीचे कार्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने स्वयंचलित केल्यामुळे कार्याचा दर्जा वाढतो, परंतु सामान्यज्ञान आणि अभिज्ञानाच्या अभावामुळे मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेचे सामर्थ्य सीमित होते.

– वैशाली फाटक-काटकर 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org