बुद्धिमत्तेचा संबंध मेंदूशी असतो. याच मेंदूमधील मज्जातंतू हेच मुळात बुद्धिमत्तेत समाविष्ट असणाऱ्या आकलनक्षमता, स्मृती आणि निर्णयक्षमता यांची अफाट गती ठरवतात आणि त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा कोणताही विचार मज्जातंतूंविना अपूर्ण आहे. मॅक्युलोच-पिट्स या संशोधक जोडीने १९४३मध्ये मेंदूतील न्यूरॉन्ससारखे कृत्रिम न्यूरॉन्स अशी कल्पना मांडली आणि एका रीतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचे बीजारोपण झाले. मज्जातंतूंचे काम संगणकासारखे असते. यात इतर मज्जातंतूंकडून संदेश मिळवणे (इनपुट), त्यावर प्रक्रिया करणे (सीपीयू) आणि संदेशाचे प्रक्षेपण (आउटपुट) हे तर असतेच पण यापेक्षाही वेगळे बरेच काही घडत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉल्टर पिट्स ज्यूनियर (२३ एप्रिल १९२३ – १४ मे १९६९) हे तर्क शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधनामुळे आकलन विज्ञान, मनोविज्ञान, तत्त्वज्ञान, मेंदू विज्ञान, संगणक विज्ञान, कृत्रिम मज्जातंतू जाळे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या संशोधनात महत्त्वाची भर पडली. त्यांनी वॉरन मॅक्युलोच या संशोधकासोबत लिहिलेल्या ‘मज्जातंतूंच्या कार्यपद्धती’ या प्रबंधामधून यासाठी एक गणिती नमुना प्रस्तुत केला होता, तो आजही हा एक संदर्भ मानला जातो. ‘गणिती जैव-भौतिकी’ अशी विज्ञानाची एक नवी शाखा यावेळी सुरू झाली.

अत्यंत हुशार असणारे वॉल्टर पिट्स काहीसे लहरी होते. १९३८ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी ते बर्ट्रांड रसेल यांची भाषणे ऐकण्यासाठी घरातून पळाले होते. सांकेतिक तर्कशास्त्रज्ञ म्हणून मान्यता असलेल्या वॉल्टर पिट्स यांची १९४२ साली मॅक्युलोच यांच्याशी भेट झाली. यामधून १९४३ साली जागतिक कीर्तीचा प्रबंध प्रकाशित झाला. मॅक्युलोच आणि त्यांच्या पत्नी यांनी अनेकदा प्रयत्न करूनही पिट्स यांनी आपली पदवी मात्र कधीच पूर्ण केली नाही.

वॉरन स्टर्जिस मॅक्युलोच (१६ नोव्हेंबर १८९८ – २४ सप्टेंबर १९६९) हे एक अमेरिकन न्युरोफिजिऑलॉजिस्ट आणि सायबरनेटिक्स तज्ज्ञ होते. मेंदूच्या काही सिद्धांताच्या पायावर काम करण्यासाठी आणि सायबर्नेटिक्स चळवळीतील योगदानासाठी ते ओळखले जातात. त्यांची ख्याती मनोवैज्ञानिक, संगणकतज्ज्ञ, कवी आणि विचारवंत अशी होती. त्यांनी सायबरनेटिक्स विषयाचे जनक नॉरबर्ट वीनेर यांच्याबरोबर काम केले. मॅक्युलोच यांचा स्वभाव काहीसा थट्टेखोर असावा. त्यांच्या एका लेखाचे शीर्षक होते ‘‘आपले मन आपल्या मेंदूत का असते?’’ थ्रेशोल्ड लॉजिक नावाच्या गणिती अल्गोरिदमवर आधारित संगणकीय प्रारूप निर्माण करणाऱ्या मॅक्युलोच-पिट्स यांची कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कामगिरी अतुलनीय म्हणावी लागेल.

श्याम तारे,मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal maculochpitts neuron intelligence amy
Show comments