मार्क झकरबर्ग हे फेसबुकमुळे जगभर प्रसिद्ध झालेले नाव. मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनीचे ते संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीही आहेत. या कंपनीच्या सेवांत फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर इत्यादींचाही समावेश होतो.
मार्क झकरबर्ग यांचा जन्म १४ मे १९८४ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. शाळेत असतानाच त्यांनी संगणक आणि सॉफ्टवेअरसंदर्भात छोटेखानी प्रयोग सुरू केले होते. माध्यमिक शिक्षण घेताना त्यांनी एक प्रोग्राम तयार करून घरी असलेला संगणक आणि दंतचिकित्सक असलेल्या वडिलांच्या दवाखान्यातील संगणक एकमेकांशी जोडले. सिनॅप्स प्लेयर नावाचे म्युझिक प्लेयरसदृश उपकरणही त्यांनी तयार केले. या उपकरणात संगीत ऐकणाऱ्यांच्या सवयी जाणून घेण्यासाठी मशीन लर्निंग तंत्राचा वापर करण्यात आला होता. झकरबर्गने मुलांसाठी विविध संगणकीय खेळही तयार केले होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झकरबर्ग यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी फेसबुकमध्ये फेसबुक-मेटाव्हर्स तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. मेटाव्हर्स ही अशी एक आभासी दुनिया आहे जिथे खरेदी, खेळ, संगीत, परस्पर संवाद, या सर्व गोष्टींचा अनुभव घेता येतो. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा म्हणता येईल अशा ‘मेटा एआय’ची रचना मार्क झकरबर्ग यांनी सुरू केली. मेटा एआय मुक्त स्राोत आहे. त्याचा उपयोग विविध गोष्टी शिकण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी केला जातो. २०१३मध्ये मेटाने फेसबुक एआय रिसर्च प्रयोगशाळा ( FAIR) स्थापन केली. यात संगणक विज्ञान, नैसर्गिक भाषा संस्करण आणि रोबोटिक्स या क्षेत्रांतील नवीन संशोधनांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रगती करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. मेटाने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून आपल्या सेवांमध्ये सुधारणा केल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना गोपनीयता, योग्य माहिती सुचवणारी यंत्रणा, हानीकारक माहिती शोधणे आणि काढून टाकणे या सुविधाही मेटाने उपलब्ध करून दिल्या आहेत. ऑक्युलस हेडसेटच्या तंत्रज्ञानाने त्रिमितीतील आभासी वातावरण अनुभवण्याची संधी मेटाने उपलब्ध करून दिली.
मार्क झकरबर्ग यांचा दृष्टिकोन आणि नेतृत्व या माध्यमातून मेटा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आणखी प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आज पहिल्या पातळीवर आहे. ती दुसऱ्या व्यापक बुद्धिमत्ता म्हणजे ‘आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्स’ पातळीवर नेण्यासाठी झकरबर्ग यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘आंत्रप्रेनर ऑफ द इयर’, ‘पर्सन ऑफ द इयर’ आणि ‘टेक आंत्रप्रेनर ऑफ द इयर’ म्हणून मार्क झकरबर्ग यांना अनेकदा गौरविण्यात आले आहे.
– अनघा वक्टे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org