खनिजांचे वा संयुगांचे वितळणबिंदू प्रयोगाद्वारे जाणून घेणे, हे अनेक वेळा कठीण ठरते. भूशास्त्रीय उत्खननात शोधल्या गेलेल्या खनिजांत आढळणारी खनिजांची मात्रा अत्यल्प असते. तसेच काही खनिजांचे वितळणबिंदू इतके उच्च असतात की, त्यांचे मापन करणारी साधने सहज उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशा खनिजांचे वितळणबिंदू जाणून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकणार असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे.
एखादे खनिज किंवा एखादे संयुग कोणत्या तापमानाला वितळेल, हे त्यातील रेणूंच्या एकमेकांतील आकर्षणावर अवलंबून असते. हे आकर्षण तीव्र असेल, तर त्या रसायनाचा वा खनिजाचा वितळणबिंदू उच्च असतो. रेणू-रेणूतील हे आकर्षण, त्या रेणूंच्या रचनेवर व इतर विविध गुणधर्मावर अवलंबून असते. सदर संशोधनासाठी, संशोधकांनी ज्यांचे वितळणबिंदू आणि विविध गुणधर्म माहीत आहेत अशा २६ हजार संयुगांची यादी तयार केली व त्यातून नऊ हजारांहून अधिक संयुगांची आपल्या संशोधनासाठी निवड केली. त्यांतील सुमारे साडेआठ हजार संयुगांचा वापर या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या प्रशिक्षणासाठी केला. या सर्व संयुगांचा वितळणबिंदू आणि गुणधर्माचा तपशील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला पुरवून तिला प्रशिक्षित केले गेले. पुरवलेल्या गुणधर्मात त्या संयुगांची रासायनिक सूत्रे, त्यांतील अणूंची रचना, त्यांची त्रिज्या, त्यांचे अणुभार, त्यांचे इलेक्ट्रॉनबद्दलचे आकर्षण, त्यांच्या आयनिभवनासाठी लागणारी ऊर्जा, अशा एकूण १४ घटकांचा समावेश होता.
हेही वाचा >>> कुतूहल : गंधज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
यानंतर या संशोधकांनी उर्वरित साडेसातशे संयुगांची चाचणी घेतली. या चाचणीसाठी या संशोधकांनी प्रशिक्षित केल्या गेलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला या संयुगांची फक्त सूत्रे सांगितली. या सूत्रांवरून या प्रणालीने त्या-त्या संयुगाची रचना, त्यातील अणूंचे गुणधर्म लक्षात घेऊन, या संयुगांतील विविध अणूंचे एकमेकांवर होणारे परिणाम ओळखले व या संयुगांच्या वितळणिबदूंचे भाकीत केले. जेव्हा या भाकिताची या संयुगांच्या ज्ञात वितळणिबदूंशी तुलना करण्यात आली, तेव्हा प्रणालीने केलेले भाकीत आणि प्रत्यक्ष वितळणबिंदू हे एकमेकांशी समाधानकारकरीत्या जुळले. किंबहुना, अगदी उच्च म्हणजे तीन हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वितळणिबदूंच्या बाबतीतही, दोन्हींतील फरक स्वीकारार्ह होता. याबरोबरच या संशोधकांनी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या पद्धतीवरून सव्वातीन हजार अंश सेल्सिअसहून अधिक उच्च वितळणबिंदू असणाऱ्या, आतापर्यंत अज्ञात असणाऱ्या २० संयुगांची सूत्रे शोधून काढली आहेत. जर ही संयुगे तयार करणे शक्य झाले, तर त्यांचा उपयोग अत्यंत उच्च तापमानाच्या परिस्थितीत करता येणार आहे.
– डॉ. राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org