‘सोफिया’ नावाच्या जहाजातून वैज्ञानिक सफर करणाऱ्या स्वीडिश अभ्यासकांना सन १८६८ मध्ये सैबेरियाच्या उत्तरेला असणाऱ्या कारा समुद्राच्या तळाशी काळ्या रंगाचे, सच्छिद्र, गोलाकार दगड मिळाले. जगाला त्याचा फारसा पत्ता लागला नाही. पण १८७२ ते १८७६ या कालावधीत इंग्रज संशोधकांनी ‘चॅलेंजर’ नावाच्या जहाजाने केलेल्या सफरीत असे दगड बऱ्याच ठिकाणी आढळले. आता मात्र चांगलाच गाजावाजा झाला.

सागराच्या तळाशी साधारणत: ३,५०० ते ६,५०० मीटर खोलीवर असे दगड सर्वत्र सापडतात. बटाटयांच्या आकाराच्या या दगडांमध्ये अनेक धातूंची संयुगे आढळतात. त्यात मुख्यत्वेकरून मँगॅनीज, आणि त्याच्या खालोखाल लोहाचा अंश असतो. सुरुवातीला त्यांना मँगॅनीजयुक्त गाठी (मँगॅनिफेरस नोड्यूलस) आणि नंतर लोह-मँगॅनीजयुक्त गाठी (फेरोमँगॅनीज नोड्यूलस) म्हटले जात होते. त्यांचे अनौपचारिक वर्णन ‘सागरतळावरचे बटाटे’ असे होत असले, तरी वैज्ञानिक परिभाषेत त्यांना ‘बहुधात्वीय संग्रथने’ (पॉलिमेटॅलिक कॉन्क्रीशन्स) म्हणतात. त्यांच्या रूपाने लोह, निकेल, कोबाल्ट, शिसे, तांबे आणि अल्प प्रमाणात जस्त, सोने, चांदी यांचे प्रचंड साठे सागरतळावर सापडले आहेत. काही ठिकाणी तर त्यांचे साठे फारच मोठ्या प्रमाणात मिळतात. मेक्सिकोपासून पेरूपर्यंत पसरलेल्या प्रशांत महासागराच्या पूर्व भागात, क्लॅरियन आणि क्लिपरटन नावांच्या बेटांदरम्यान सागरतळावर प्रचंड मोठा मैदानी प्रदेश आहे. तिथल्या भूवैज्ञानिक संरचनांमुळे त्याला ‘क्लॅरियन-क्लिपरटन भंजन क्षेत्र’ (क्लॅरियन-क्लिपरटन फ्रॅक्चर झोन) म्हणतात. तिथे हे ‘बटाटे’ फार मोठ्या प्रमाणात मिळतात. हिंद महासागराच्या मध्यवर्ती भागातही ते मुबलक प्रमाणात मिळतात. भारताच्या सागरी क्षेत्रात बंगालच्या उपसागरातल्या अंदमान द्वीपसमूहाच्या परिसरात आणि काही प्रमाणात अरबी समुद्रातही ते मिळतात.

सागरतळाशी असणाऱ्या गाळातून आणि सागरातल्या पाण्यातून दोन ते दहा सेंमी व्यास असणाऱ्या या संग्रथनांमध्ये धातूंच्या संयुगांचे कण जमा होण्यासाठी लाखो वर्षांचा काळ लागतो. जलचरांच्या हाडांचे तुकडे, महाकाय माशांचे दात, अन्य टणक वस्तू, यांच्याभोवती हळूहळू गाळ, धातूंचे आणि त्यांच्या खनिजांचे कण जमा होत होत हे तथाकथित ‘बटाटे’ तयार होतात. वाढती लोकसंख्या आणि त्यातून वेगाने होणारे अवैध खाणकाम, यामुळे एके ना एके दिवशी खनिजांचे साठे संपणार आहेत. तेव्हा याच बहुधात्वीय संग्रथनांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्मार्टफोन, पवनचक्की, सौर फलक (सोलर पॅनेल) अशा अनेक वस्तूंच्या उत्पादनासाठी आपल्याला त्यांच्याकडे वळावे लागेल.

– डॉ. श्वेता चिटणीस, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org