आपल्या देशातील विविध मत्स्य प्रजातींच्या जननद्रव्याचे संवर्धन व्हावे या हेतूने राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो (नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक्स रिसोर्सेस-एनबीएफजीआर) या संस्थेची स्थापना डिसेंबर १९८३ मध्ये प्रयागराज (अलाहाबाद) येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या आधिपत्याखाली झाली. सुरुवातीला १९९९ मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ५२ एकर जागेत, या विषयातील प्रयोगशाळा, मत्स्यशेतीची सोय, शेततळी, प्रशासकीय कचेऱ्या वगैरे निर्माण करण्यात आल्या. विविध माशांच्या जननद्रव्याचा पूर्ण अभ्यास करून त्यातून त्यांच्या संवर्धनासोबतच शाश्वत मासेमारी आणि भावी पिढीसाठी बौद्धिक मालमत्ता अधिकाराच्या हक्कांचे रक्षण करणे या दूरदृष्टीने या संस्थेची उभारणी करण्यात आली. प्रत्येक खाद्य प्रजातीची जनुकीय माहिती कायमस्वरूपी सूचिबद्ध स्वरूपात येथे जतन करण्यात येते. त्याप्रमाणे मत्स्य संवर्धनाचे कार्यक्रम आखले जातात. आपल्या स्वकीय प्रजातींच्या आरोग्यावर परकीय प्रजातींचा काय परिणाम होतो याचा तुलनात्मक अभ्यास केला जातो.
हेही वाचा >>> कुतूहल : ग्वानोची बेटे
याचबरोबर सिंधू, गंगा, घाघरा, ब्रह्मपुत्रा, महानदी, कृष्णा, गोदावरी आणि या साऱ्यांच्या उपशाखांतील मत्स्यप्रजातींचे वर्गीकरण, त्यांच्या नैसर्गिक साठय़ाचा माहितीकोश बनवणे हे कामदेखील केले जाते. या संस्थेची निवड ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून झाली आहे, कारण त्यांनी दोन हजार ९५३ मत्स्य प्रजातींची संपूर्ण माहिती असलेला विदासंच निर्माण केला आहे. याशिवाय मन्नारची सामुद्रधुनी, वेम्बनाड सरोवर, पश्चिम घाट आणि ईशान्य घाट प्रदेशातील गोडय़ा पाण्यातील मत्स्य प्रजाती, अशांचादेखील समावेश केला आहे. फिश बारकोड माहिती संस्था, जैवतंत्रज्ञानविषयक माहिती (फिश कारयोम), तंतूकणिकेत असलेली जनुकीय माहिती (फिश आणि शेलफिश मायक्रो सॅटेलाइट डेटाबेस आणि फिश मिटोजीनोम रिसोर्स) हे सारे काम त्यांनी पार पाडले आहे. गेल्या १० वर्षांत विविध परिसंस्थांतील ४३ नव्या मत्स्यप्रजातींचा शोध लावला आहे. रोहू, मागूर अशा व्यापारी मूल्य असणाऱ्या प्रजातींचा संपूर्ण जीनोम शोधला आहे. डीएनए बारकोडिंग तंत्राच्या साहाय्याने पापलेट, व्हेल शार्क आणि सी काऊ (डय़ुगाँग) यांच्या संरक्षणासाठी कायदेशीर पावले उचलली आहेत. ‘राज्यमत्स्य’ ही संकल्पना या संस्थेने राबवली आणि त्यामुळे आजपावेतो १८ राज्यांनी १५ मत्स्य प्रजातींना राज्यमत्स्य हे मानाचे स्थान दिले आहे.
डॉ. नंदिनी वि. देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org