‘राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था’ (नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) ही संस्था भारताच्या वैज्ञानिक आणि औद्याोगिक अनुसंधान परिषदे’च्या (काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) कार्यकक्षेत येणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९६१ मध्ये झाली. ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ या केंद्र शासनाच्या विभागाचे माजी महानिदेशक डॉ. महाराजपुरम सीतारामन कृष्णन यांच्या प्रयत्नातून ही संस्था उभी राहिली. १९६१ ते १९६४ या काळात संस्थेचे तेच पहिले संचालक होते. या संस्थेचे हैदराबाद इथे मुख्यालय आहे.
भूभौतिकी (जिओफिजिक्स) म्हणजेच पृथ्वीच्या भौतिक प्रक्रिया आणि रचना यांचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा. हा अभ्यास गणितीय आणि भौतिकीतल्या पद्धती वापरून केला जातो. या प्रकारच्या आंतरविद्याशाखीय विज्ञानात मुख्यत्वे भूकंप, चुंबकीय क्षेत्र, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण क्षेत्र, खनिजे, खडक व हवामान व त्याचा प्रभाव यांचा अभ्यास केला जातो. पृथ्वीशी निगडित जटिल भूवैज्ञानिक प्रक्रिया आणि भूरचना, तसेच त्यांच्यावर प्रभाव टाकणारे विविध घटक यांचा अभ्यास करणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा प्रमुख उद्देश होता. पृथ्वीशी संबंधित विविध भूवैज्ञानिक प्रणाली आणि प्रक्रिया यांचा परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजेच भूगतिकी (जिओडायनामिक्स), भूकंपाचे धोके व परिणाम आणि नैसर्गिक संसाधने या क्षेत्रांतील संशोधनावर या संस्थेचा मुख्य भर आहे
एकूण संशोधन आणि विकास यांसाठीचे मुख्य सात विभाग असून, त्यांच्याशी संबंधित इतर २१ प्रकारच्या क्षेत्रांत संशोधन कार्य केले जाते. भूभौतिकी, भूरासायानिक, जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, जीपीएस), गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय क्षेत्र, पाषाणयांत्रिकी (रॉक मेकॅनिक्स), हवावाहित भौतिकी (एअरबोर्न फिजिक्स) या व त्यांच्याशी निगडित क्षेत्रांत संशोधन केले जाते. यांत्रिकीकरण सेवा, भूजल, भूऔष्णिक संसाधन, हायड्रोकार्बन या घटकांचा अभ्यास केला जातो. ग्रहविषयक विज्ञान (प्लॅनेटरी सायन्स) आणि पृथ्वी प्रक्रिया प्रतिमानकरण (अर्थ प्रोसेस मॉडेलिंग) या नवीन आणि आव्हानात्मक क्षेत्रांत संस्थेने लक्षणीय प्रगती केली आहे. भूकंप या नैसर्गिक आपत्तींबद्दल महत्त्वाचे संशोधन; तसेच भूकंपाची पूर्वसूचना मिळण्याबाबतही या संस्थेद्वारे संशोधन केले गेले आहे.
या संस्थेतील संशोधन प्रक्रिया भूभौतिकीच्या प्रत्येक शाखेसाठी विकसित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या गटांमध्ये त्या विषयातील संशोधन तज्ज्ञांद्वारे केले जाते. याशिवाय संस्थेत मनुष्यबळ विकास विभागाद्वारे सर्व तज्ज्ञांना योग्य ते प्रशिक्षण ठरावीक कालावधीनंतर देऊन त्यांचे ज्ञान अद्यायावत ठेवले जाते. हरी नारायण ज्ञान संसाधन केंद्र (हरी नारायण नॉलेज रिसोर्स सेंटर) हे संस्थेमधील आधुनिक व समृद्ध ग्रंथालय आहे.
– ऋतुजा पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org