संशोधकांनी संगणकाला अनेक कामांमध्ये तरबेज केल्यामुळे संगणक अतिशय जलद काम करू लागले होते. आता काम करणाऱ्या संगणकाला विचार करता यावा आणि त्यात निर्णयक्षमता यावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठीच्या प्रयत्नांत मेंदूचा विषय टाळलाच जाऊ शकत नव्हता कारण मानवाची निर्णयक्षमता मेंदूशीच संलग्न असते.
थोडक्यात सांगायचे तर कामे करण्यास सक्षम झालेल्या संगणकाला माहितीचा आधार देऊन स्वत:च्या मनाने गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यास सक्षम करणे हे संशोधकांपुढे आव्हान होते. गणित आणि तर्कशास्त्र या दोन्ही विषयांची या बाबतीत आवश्यकता होती. यात १९२९ साली जपानी संशोधक मकोतो निशिमुरा यांनी पहिला यंत्रमानव तयार केला तर १९५० मध्ये अॅलन ट्यूरिंग यांनी ‘संगणक यंत्रे आणि बुद्धिमत्ता’ या प्रबंधाच्या माध्यमातून यंत्रांच्या बुद्धिमत्तेचा विषय मांडला.
निल्स जॉन निल्सन (६ फेब्रुवारी १९३३ – २३ एप्रिल २०१९) या अमेरिकी संगणक वैज्ञानिकाला ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ क्षेत्रातील आद्या संशोधकापैकी एक असा मान दिला गेला आहे. त्यांचा जन्म अमेरिकेच्या मिशिगन राज्यात झाला आणि सुप्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळविली. आपले पुढील बहुतेक सर्व संशोधन त्यांनी एका खासगी संशोधन संस्थेत केले. त्यांनी १९५८ ते १९६१ पर्यंत अमेरिकी हवाई दलात काम केले.
१९६६ नंतरच्या आपल्या कामात निल्सन यांनी चार्ल्स रोसेन आणि बर्ट्राम राफेल या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘शेकी’ नावाचा एक यंत्रमानव तयार केला. संवेदकाकडून माहिती घेऊन हा यंत्रमानव कामाचा आराखडा तयार करीत असे आणि त्यानुसार निर्णय घेऊन काम करत असे. शेकीच्या निर्णयक्षमतेचा संशोधनावर खूप प्रभाव होता. हा प्रभाव या काळातील सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये दिसत असे.
१९८५ मध्ये निल्सन हे स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या संगणक विभागात रुजू झाले आणि १९९० पर्यंत विभागप्रमुख होते. त्यांना प्रतिष्ठेचे असे ‘कुमागाई’ हे महनीय प्राध्यापकपद प्रदान केले गेले. जीवनाच्या अखेरपर्यंत ते या पदावर होते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी भरपूर लेखन केले असून या विषयावर त्यांची पाच पुस्तके जगभरात मान्यता पावली आहेत. २०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या सहाव्या पुस्तकाचे शीर्षक थोडे वेगळे म्हणजे ‘श्रद्धेचा अर्थ समजून घेताना’ असे आहे.
– श्याम तारे, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org