‘द ओशन क्लीन अप’ या अशासकीय संस्थेने २०२१ मध्ये समुद्र सफाईसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर करून चालणारी उपकरणे वापरली. ही संस्था यंत्र शिक्षणतंत्राने प्लास्टिक प्रदूषणावर नजर ठेवते. समुद्राच्या पाण्यात प्लास्टिक कुठून कुठे जाते आहे, त्याची हालचाल सतत लक्षात घेत असते. हे प्लास्टिकवर नजर ठेवणारे ‘मॉडेल’ अनेक ठिकाणच्या स्रोतांवर एकाच वेळी लक्ष ठेवून असते. कृत्रिम न्युरल नेटवर्कच्या साह्याने या कचऱ्यातील विविध वस्तूंची ओळखदेखील पटवली जाते. या तंत्रप्रणालीत जटिल अशी गणिती समीकरणे तयार केलेली असतात. या कृत्रिम न्युरल नेटवर्कला प्लास्टिक कचऱ्यातील विविध वस्तूंची ओळख करून दिली जाते आणि त्यानुरूप कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने या कचऱ्याचा अभ्यास केला जातो. यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन केले गेले आहे.
हेही वाचा >>> कुतूहल : सागरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
२०१६ साली झालेल्या ‘एरियल एक्सपिडिशन’मध्ये विमानातून खाली दिसणाऱ्या समुद्रातील कचऱ्यातील सुमारे चार हजार निरनिराळ्या वस्तूंची छायाचित्रे टिपली गेली होती. या चित्रांना ‘ट्रेनिंग इमेजेस’ असे म्हटले गेले. या छायाचित्रांचा वापर करून मॉडेलला कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर त्यांचे विश्लेषण करून त्यावरून कचरा निवडण्यास सुरुवात झाली. ओशन क्लीन अपने मेर्क्स ट्रान्सपोर्टरकडून २०१९ मध्ये अधिक विदा मिळवली. या प्रक्रियेत बंदरावरून, तसेच जहाजांच्या बोर्डावरून एक लाखापेक्षा जास्त ‘टाइम लॅप्स’ पद्धतीने काढलेले फोटो उपयोगी ठरले. ‘जिओ टॅगिंग’मुळे ते नक्की कोणत्या अक्षांश रेखांशांत आहेत याची नेमकी माहिती मिळाली. प्रत्येक वस्तूचे नेमके स्थान कळल्यामुळे क्लीन अप टीमने अक्षांश-रेखांशाप्रमाणे वेगवेगळ्या प्रदेशांतील कचऱ्याची प्रतवारी केली, त्याची घनतादेखील मोजण्यात आली. समुद्रात कुठे कुठे जास्त प्रमाणात प्लास्टिक आहे, ते भाग लक्षात घेण्यात आले आणि मग सफाईला सुरुवात करण्यात आली. २०२४ संपेपर्यंत ओशन क्लीन अप संस्था समुद्रातील ९० टक्के प्लास्टिकचे या पद्धतीने पूर्णपणे निर्मूलन करेल, असा अंदाज आहे.
हेही वाचा >>> कुतूहल : समुद्रविज्ञान अभ्यासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
‘रेझर’ या कंपनीने २०२१मध्ये ‘क्लीअर बॉट’ या कंपनीशी भागीदारी करून यंत्र शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा बॉट तयार केला. समुद्रातील प्लास्टिक दोन मीटर अंतरावर, खळबळणाऱ्या पाण्यात असले तरी हा बॉट ते दाखवू शकतो. सौर ऊर्जेवर चालणारा हा बॉट एका चक्रीय प्रवासात सुमारे अडीचशे किलो प्लास्टिक गोळा करतो. ही पद्धत जगन्मान्य झाल्यास जगभरातील महासागर प्लास्टिकविरहित होऊ शकतील.
–डॉ.नंदिनी विनय दशमुख
मराठी विज्ञान परिषद
इमेल:office@mavipa.org
सकेंतस्थळ :http://www.mavipa.org