‘महाराष्ट्राची सागर संपदा’ हे जुलै २०२२ मध्ये ‘कांदळवन प्रतिष्ठान’ यांनी प्रसिद्ध केलेले अतिशय उपयुक्त असे चित्रमय पुस्तक आहे. डॉ. विशाल भावे, अतुल साठे आणि त्यांचे गुरुवर्य डॉ. दीपक आपटे या लेखकत्रयीने लिहिलेले हे पुस्तक समुद्र विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त तर आहेच, शिवाय शंख, शिंपले यांच्या प्रजाती ओळखू इच्छिणाऱ्या हौशी व्यक्तींनाही त्याचा लाभ घेता येईल. महाराष्ट्राची सागरी आणि किनारी जैवविविधता नेमक्या पद्धतीने या पुस्तकात मांडण्यात आली आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या संपूर्ण किनाऱ्यांवरील सागरी अधिवास, त्यांचे भौगोलिक स्थान यांचाही ऊहापोह केला गेला आहे. वालुकामय, खडकाळ आणि चिखलयुक्त किनाऱ्यांनी आढळणारे अपृष्ठवंशीय प्राणी, मत्स्य प्रजाती, साप व कासवांसारखे सरीसृप, समुद्री पक्षी, महाराष्ट्रात आढळणारे समुद्री सस्तन प्राणी आणि इतर जैविक संसाधनांची छायाचित्रांसह माहिती पुस्तकात दिली आहे. याशिवाय नजीकची कांदळवने, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील किनारी पठारे, मालवण सागरी अभयारण्य, वेंगुर्ला रॉक्स, अँग्रिया बँक अशा अधिवासांची माहितीदेखील या पुस्तकात सापडते.
‘महाराष्ट्रातील सागरी जैवविविधतेची २५ आश्चर्यकारक सत्यं’; या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात दिलेली माहिती समुद्राविषयीचे कुतूहल जागे करणारी आहे. सागरी अन्नसाखळीत असणारे विविध प्राणी एकमेकांच्या आंतरसंबंधांनी पर्यावरणाचे संतुलन कसे राखतात, याचीही माहिती हे वाचताना मिळते. समुद्राच्या सान्निध्यात असणाऱ्या कांदळवनातील अतिशय संवेदनशील अशा क्षेत्रात किती प्रकारच्या जैविक प्रक्रिया होत असतात, हे वाचल्यानंतर प्रत्येक जण या परिसंस्था टिकवण्यासाठी धडपडेल याविषयी शंकाच नाही. विविध वलयी, संधिपाद, मृदुकाय आणि कंटकचर्मी प्राणी कोणते आणि कुठे कुठे आढळतात, याची सचित्र माहिती विद्यार्थाना मार्गदर्शन करते.
समुद्र पर्यटनाला निघणाऱ्या व्यक्तींनी कोणती पथ्ये पाळावीत आणि सागराची ओळख कशी करून घ्यावी, याबद्दल माहिती देताना लेखक ‘‘हे करा, हे करू नका!’’ असे योग्य मार्गदर्शन करतात. शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना समुद्र सहलीसाठी नेताना शिक्षकांनी हे पुस्तक नक्की न्यावे. या पुस्तकातील सर्व छायाचित्रे खुद्द लेखकत्रयी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने टिपलेली आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे मूल्य अधिकच वाढते. प्रत्येक शैक्षणिक संस्थेच्या ग्रंथालयात या पुस्तकाची प्रत असणे आवश्यक आहे.
– डॉ. नंदिनी वि. देशमुख ,मराठी विज्ञान परिषद