सुमारे ४२ हजार अब्ज रुपये एवढी वार्षिक उलाढाल असलेल्या क्रीडाविश्वाकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आकर्षित झाली नसती तरच नवल. आज या खेळांच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्तेने चांगलेच बस्तान बसवले आहे.
खेळ मैदानात चाललेला असो की नंतर त्या खेळाच्या केलेल्या दृकश्राव्य चित्रणाचे विश्लेषण असो, नवीन खेळाडू चमूमध्ये घ्यायचा असो की चमूतील खेळाडूच्या खेळाचे मूल्यमापन करायचे असो, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे कच्चे दुवे शोधायचे असोत की आपल्या खेळाडूचे प्रावीण्य शोधायचे असो, या आणि अशा अनेक प्रक्रियांमध्ये आज कृत्रिम बुद्धिमत्ता सर्रास उपयोगात आणली जात आहे. क्रीडाविश्वातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे मूल्यांकन २०३० पर्यंत सुमारे २० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे १६०० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल असा बाजारतज्ज्ञांचा अंदाज आहे.
या क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वांत पहिला महत्त्वाचा उपयोग म्हणजे चमूसाठी खेळाडू निवडणे. आतापर्यंत हे काम केवळ तज्ज्ञ आणि वरिष्ठ खेळाडूंकडे होत असे. आता त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत मिळते. जगभरातील मान्यवर क्लब आणि संस्था आता नवीन खेळाडूंची भरती करताना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अॅपची मदत घेतात. विविध खेळांनुसार असे अनेक अॅप आज उपलब्ध आहेत. जगभरात विविध क्लब किंवा टीममधून खेळणाऱ्या खेळाडूंचे व्हिडीओ आणि खेळाडूंची संपूर्ण माहिती या अॅपला पुरविली जाते. हे अॅप या व्हिडीओपासून खेळाडूंच्या विविध ‘अॅक्शन क्लिप्स’ तयार करते. मग त्यांचा अभ्यास करताना त्या खेळासाठी कोणकोणत्या गोष्टी अत्यावश्यक आहेत, कोणते गुणधर्म त्या खेळाडूत असणे आवश्यक आहेत. उदाहरणार्थ उंची, चपळपणा, स्टॅमिना इत्यादी, त्याप्रमाणे त्या खेळाडूची खेळण्याची शैली, त्याच्याकडून होणाऱ्या चुका अशा अनेक गोष्टी विचारात घेऊन एक गुणवत्ता यादी निर्माण करते. आणि क्लब किंवा संस्था त्या यादीनुसार आणि त्या खेळाडूच्या रकमेच्या मागणीनुसार परवडणारे खेळाडू टीममध्ये समाविष्ट करतात.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या अॅपमुळे आता खेळाडू शोधण्यासाठी ते ज्या ज्या ठिकाणी, विविध देशांमध्ये किंवा विविध शहरांमध्ये खेळत असतील तेथे प्रत्यक्ष जाऊन त्यांचा खेळ पाहणे आणि मग निवडणे गरजेचे राहिलेले नाही. त्यामुळे क्लब किंवा संस्थाचा खेळाडू भरतीसाठी लागणारा वेळ आणि पैसा यांची मोठ्या प्रमाणावर बचत होते.
शशिकांत धारणे
© The Indian Express (P) Ltd