ध्रुवीय अस्वलांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे म्हणून ‘जागतिक ध्रुवीय अस्वल दिन’ २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ध्रुवीय अस्वले टिकून राहणे कठीण असले, तरीही किती आवश्यक आहे, हे यानिमित्ताने जनमानसात रुजविले जाते. ही पांढरी अस्वले दीड लाख वर्षांपासून अस्तिवात असल्याचे जीवाश्म पुरावे आहेत. एतद्देशीय लोक काही प्रमाणात त्यांची शिकार करत असत. नंतरच्या काळात म्हणजे १७०० पासून मात्र युरोपीय, रशियन शिकाऱ्यांनी त्यांची खूप मोठय़ा प्रमाणावर कत्तल केली. त्यातच भर म्हणून अधिकाधिक वेगाने होणारी जागतिक तापमानवाढ आणि हिमनगांचे वितळणे, यामुळे ध्रुवीय अस्वलांच्या वावराचे, अन्नग्रहणाचे क्षेत्र आक्रसत गेले. त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यांना विश्रांती घेण्यासाठी हिमनगांची आवश्यकता असते. परंतु जागतिक तापमानवाढीच्या गंभीर दुष्परिणामांमुळे ध्रुवीय अस्वलांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. यासारख्या समस्यांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी, यासाठी २०११पासून जागतिक ध्रुवीय अस्वल दिन साजरा केला जाऊ लागला.
स्थानिक ध्रुवीय अस्वलांचा मागोवा घेऊन त्यांची राहण्याची ठिकाणे (घळी, गुहा) शोधून ती नकाशावर नोंदविली जातात. लवकरच बाळंत होणाऱ्या अस्वल माद्या बर्फात खोल बिळे खोदतात. त्यात अंडाकृती दोन-तीन लहान-मोठे कक्ष तयार करतात. मोठय़ा कक्षात अस्वल माता आणि लहान कक्षात दोन-तीन बछडे एकत्र मुटकुळी करून शीतकालसमाधीत शिरतात. या दीर्घ झोपेत अंगात कातडीखाली साठवलेली चरबी अन्न म्हणून उपयोगी पडते.
नोंद केलेल्या अस्वलांच्या निवासस्थानी साहसी प्रवासी, संशोधक, शिकारी, फरचे व्यापारी आणि एकूणच मानवी पावले वळणार नाहीत याची काळजी घेण्यात येते. त्यातून अस्वलांचे बच्चे आणि अस्वलमाता यांची शीतकालसमाधी भंगणार नाही याची खात्री होते. बछडय़ांचे भविष्य सुरक्षित राहण्याची शक्यता वाढविता येते. बाहेर हिमवादळे, जोराचा वारा, हिमकणांचा मारा आणि शून्याखाली ३४ अंश सेल्सिअस तापमान असले तरी गुहेतील तापमान दोन-तीन अंश सेल्सिअस एवढे उबदार राहू शकते आणि बंदिस्त जागेत सुरक्षितताही मिळते.
ध्रुवीय अस्वलाची परिसंस्थेतील भूमिका महत्त्वाची आहे, कारण या भक्षक प्राण्यामुळे मासे आणि लहान शाकाहारी प्राण्यांतील दुबळय़ांची संख्या घटवली जाते. निसर्गात अन्नसाखळीद्वारे समतोल राखला जातो. आपल्यातील प्रत्येकाच्या मनावर या दिनानिमित्ताने ऊर्जाबचत, शाश्वत जीवनशैली, कार्बनी पाऊलखुणा सीमित करणे इत्यादी बाबी ठसवल्या जातात.