एकविसाव्या शतकात माणसासमोरील सर्वात मोठ्या समस्यांचा विचार केल्यास जागतिक तापमानवाढीचा प्रश्न अग्रस्थानी येतो. तापमानवाढीचा प्रश्न सोडवण्यासाठी येत्या काही वर्षांमध्ये सर्व क्षेत्रांत मूलभूत बदल घडवले नाहीत तर वातावरणात तीव्र आणि दीर्घकाळासाठी विपरीत परिणाम घडतील असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. जागतिक तापमानवाढीच्या प्रश्नाला सामोरे जाताना कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ मोलाची ठरणार आहे.
जागतिक तापमानवाढीच्या प्रश्नाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि याला समग्ररीत्या सामोरे जाण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमता महत्त्वाच्या ठरत आहेत. कर्बवायूच्या उत्सर्जनाची नोंद ठेवणे, कुठल्या औद्याोगिक क्षेत्रांमध्ये, भौगोलिक भागांमध्ये कर्बवायूचे उत्सर्जन वाढते आहे यावर लक्ष ठेवणे, सॅटेलाइट छायाचित्रांच्या आधारे जंगलतोडीच्या घटनांची नोंद घेणे, ध्रुवीय प्रदेशांमध्ये हिमनग वितळण्याच्या प्रमाणाची नोंद ठेवणे, सॅटेलाइट आणि हवामानाची नोंद करणारी उपकरणे यांच्या नोंदींच्या आधारे वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ यांचे अनुमान देणे या सगळ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची माहिती विश्लेषण करून निष्कर्ष देण्याची क्षमता उपयुक्त ठरते. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता विविध क्षेत्रांमध्ये कर्बवायूच्या उत्सर्जनासाठी जबाबदार असलेल्या प्रक्रियांची कार्यक्षमता वाढवण्याचे आणि ऊर्जेचा अपव्यय टाळण्याचे मार्ग दाखवू शकते. ‘क्लायमेट चेंज एआय’ ही संस्था मशीन लर्निंगचा वापर तापमानवाढीच्या प्रश्नासाठी कसा करता येईल यावर काम करते. युगिनी एआय ( Eugenie. ai) ही संस्था ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ (आयओटी) आणि सॅटेलाइट नोंदीचा वापर करत विविध उद्याोगांची कार्यक्षमता वाढवण्याचा आणि कर्बवायू उत्सर्जन कमी करण्याचा मार्ग सुचवते.
आयबीएमच्या ‘डीप थंडर’ प्रकल्पाच्या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर स्थानिक हवामानाचा अंदाज घेण्यासाठी, वादळे अतिवृष्टीच्या घटनांची पूर्वसूचना देण्यासाठी केला जातो. मशीन लर्निंग, डीप लर्निंगचा वापर शेती, बांधकाम क्षेत्र, वस्तूपुरवठा साखळी, वाहतूक व्यवस्था, विद्याुतपुरवठा व्यवस्था यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केला जातो. दुसरीकडे सौरऊर्जा, पवनऊर्जा यांच्यासारख्या शाश्वत ऊर्जास्राोतांच्या निर्मितीची आणि वितरणाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करते. इतकेच नाही तर नवी झाडे लावण्यासाठी, मोठ्या क्षेत्रात बीजारोपण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रोबोट्स आणि ड्रोन्सचा वापर करण्याचे प्रयोग सुरू आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये तापमानवाढीची, पर्यावरण रक्षणाची समस्या सोडवण्याची क्षमता आहे पण त्यासाठी प्राधान्य माणसाच्या आणि जीवसृष्टीच्या उन्नतीचे असायला हवे, कमी वेळात जास्त नफा कमावण्याचे नाही, अन्यथा नवे प्रश्न निर्माण होतील याचे भान ठेवायला हवे.