भाषा प्रारूपे (मॉडेल्स) काहीही स्वप्नरंजन करू शकतात. हे स्वप्नरंजन किंवा भ्रम अनेक प्रकारचे असतात. त्यांच्याकडे असलेल्या माहितीतील विरोधाभासामुळे उत्तरात अचूकतेचा अभाव, वेगवेगळे दुवे सांधताना स्वातंत्र्य घेतल्याने कल्पनारम्य दावे, पुरेशा माहितीच्या अभावामुळे अस्पष्ट वा संदिग्ध उत्तर, चुकीच्या दुव्यांची जोडणी झाल्याने बनावट उत्तरे, तपशिलाचा अभाव, पुनरावृत्ती, ‘ध’ चा ‘मा’ करणे, असे दोष निर्माण होतात.
‘ऑस्ट्रेलिया अस्तित्वात आहे का?’ याचे उत्तर चक्क नाही असे एका प्रारूपाने दिले. तसे का झाले याचा शोध घेता असे दिसले की ‘ऑस्ट्रेलिया अस्तित्वात आहे’ असे म्हणण्याची गरज
फार कधी पडत नाही, पण ‘ऑस्ट्रेलिया अस्तित्वात नाही’ असे म्हणणारे कॉन्स्पिरसी थिअरीवाले महाभाग आहेत. तेच या प्रारूपांनी उचलून धरले.
या समस्यांवर मात करण्यासाठी विशिष्ट विषयांशी संबंधित विशेष माहितीसंचाचा आधार घेता येतो. मात्र, यामुळे नव्या समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, कोणताही माहितीसंच सर्वसमावेशक नसतो आणि विशिष्ट ज्ञानाच्या मदतीने दिलेल्या विषयातील पूर्वग्रह कमी करताना, इतर विषयांतील पूर्वग्रह वाढू शकतात.
यावरही एक उपाय आहे- विविध विषयांमध्ये पारंगत प्रारूपांचा गट बनवायचा, परंतु हा सर्व किचकट आणि आपल्याला अजून पूर्णपणे न कळलेला असा प्रांत आहे. भाषा प्रारूप जितके सर्वसमावेशक असेल, तितके ते व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेजवळ नेऊ शकेल.
जीपीटीला चांगल्या सूचना दिल्या तर अधिक चांगली उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ, कवितेसाठी: ‘एखादा कवी वसंत ऋतूवर मराठीत अनुष्टुभ छंदात शब्दांची पुनरावृत्ती टाळून कविता कशी लिहील?’ (एक सावधानतेचा इशारा – छंद आणि पुनरावृत्ती हे शब्द ‘कळले’ तरी काही भाषा प्रारूपे तशा रचना करू शकतीलच असे नाही). तीच सूचना अशीही करता येईल: ‘अनुष्टुभ छंदात वसंत ऋतूवर मराठीत शब्दांची पुनरावृत्ती टाळून कविता हवी असेल तर कोणती सूचना देऊ?’ आणि मग मिळालेले उत्तर प्रत्यक्ष सूचना म्हणून वापरायचे. अशा सूचनांमुळे भाषा प्रारूपे अधिक चांगली उत्तरे देतात.
चॅटजीपीटीमुळे कवी नसलेला कोणीही आता कवी बनू शकतो, परंतु भाषा प्रारूपांची काव्यात्मकता कवींच्या भावनात्मकतेपेक्षा आणि त्यांच्या अनुभवविश्वापेक्षा सध्यातरी बरीच डावी आहे. त्याचबरोबर वरीलसारख्या सूचनांमुळे (कोणाच्याही शैलीत लिहिण्याच्या क्षमतेमुळे) नवीन नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उद्भवू लागले आहेत.
चॅट जीपीटीमुळे कवी नसलेला कोणीही आता कवी होऊ शकतो, परंतु भाषा प्रारूपांची काव्यात्मकता कवींच्या भावनात्मकतेपेक्षा आणि त्यांच्या अनुभवविश्वापेक्षा सध्यातरी बरीच डावी आहे. त्याचबरोबर वरील सूचनांमूळे (कोणाच्याही शैलीत लिहिण्याच्या क्षमतेमुळे) नवीन नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उद्भवू लागले आहेत.
संगणक कोिडग हे असे क्षेत्र आहे जिथे भाषा प्रारूपांना यश मिळाले आहे. या क्षेत्रात वारंवार केल्या जाणाऱ्या सूचना आपल्याला लीलया मिळतातच, पण त्यामध्ये टिप्पण्या जोडणे, कोड सुटसुटीत भागांमध्ये विभागणेसुद्धा सहजी होते. नेहमीप्रमाणे, चॅटजीपीटीकडून मिळालेले कोड वापरण्यापूर्वी तपासणे अनिवार्य आहे.
– आशिष महाबळ, मराठी विज्ञान परिषद