रेमंड कुर्झवाइल यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४८ रोजी अमेरिकेमधील क्वीन्स, न्यूयॉर्क येथे झाला. रेमंड कुर्झवाइल हे एक अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, लेखक आणि संशोधक आहेत. ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (ओसीआर), टेक्स्ट-टू-स्पीच सिंथेसिस, स्पीच रेकग्निशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड इन्स्ट्रुमेंट्स यासारख्या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, ट्रान्सह्युमॅनिझम, टेक्नॉलॉजिकल एकलता आणि भविष्यवाद अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली.
कुर्झवाइल यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेमधील सर्वांत महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांची टेक्नॉलॉजिकल एकलतेची संकल्पना. टेक्नॉलॉजिकल एकलता हा भविष्यातील एक असा बिंदू आहे, जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान होईल. कुर्झवाइल यांना विश्वास आहे की २०४५पर्यंत हे होईल आणि २०२९ पर्यंत एकतरी मशिन ट्युरिंग चाचणीवर सिद्ध होईल.
हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया : व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन
नॅनोरोबॉटिक्सबाबतच्या कृत्रिम बुद्धिमत्ता वापरलेली यंत्रे ट्युरिंग चाचणीत सहज उत्तीर्ण होतील. अर्थात हा आशावाद सर्वांना पटेल असा नसून, २० वर्षांत मानवाकडे नॅनोबॉट्स म्हणून ओळखली जाणारी, रक्तपेशीच्या आकाराची लाखो उपकरणे असतील, अशी चर्चा आहे. नॅनोबॉट्स आपल्या शरीरातील रोगांशी लढा देतील आणि आपली स्मरणशक्ती व संज्ञानात्मक क्षमता सुधारतील.
कुर्झवाइल पुढील पिढीतील मानवाला अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञान वापरावे, यासाठी आग्रही आहेत आणि अग्रगण्य समर्थकही आहेत. शरीराचे जीर्ण किंवा रोगट अवयव बदलण्यासाठी सेंद्रिय तसेच कृत्रिम अवयवांचे रोपण करत, कार्बन-आधारित सेंद्रिय मानवाचा ५० टक्क्यांपेक्षा अधिक बायोनिक किंवा यंत्र असलेल्या ‘ट्रान्सह्युमन’ मध्ये झालेला बदल हा मानवी उत्क्रांतीची पुढील पायरी असेल.
त्यांची ‘द एज ऑफ इंटेलिजेंट मशिन्स’, ‘द एज ऑफ स्पिरिच्युअल मशिन्स’, ‘द सिंग्युलॅरिटी इज नियर’, आणि ‘हाऊ टू क्रिएट अ माइंड’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल गंभीर चर्चा करणारी प्रसिद्ध पुस्तके कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आणि त्याच्या मानवतेवरील संभाव्य परिणामांबद्दल चर्चा करतात.
कुर्झवाइल कॉम्प्युटर प्रॉडक्ट्स, कुर्झवाइल म्युझिक सिस्टीम्स आणि कुर्झवाइल अप्लाइड इंटेलिजन्स या त्यांच्या कंपन्यांनी अनुक्रमे अंधांसाठी वाचण्याचे यंत्र (रीडिंग मशीन), संगीत सिंथेसायझर आणि स्पीच रेकग्निशन सॉफ्टवेअर विकसित केले. त्यांनी ‘कुर्झवाइल-नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड रीडर’ (के- एनएफबी रीडर)- डिजिटल कॅमेरा आणि संगणक युनिट असलेले खिशात मावणारे उपकरण विकसित केले.
कुर्झवाइल सध्या, ॲडेपार येथे सीटीओ सल्लागार, कुर्झवाइल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गूगलमध्ये अभियांत्रिकी संचालक या तीन पदांवर कार्यरत आहेत.
– गौरी देशपांडे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल: office@mavipa.org
संकेतस्थळ: http://www.mavipa.org