रॉडनी अॅलन ब्रुक्स हे ऑस्ट्रेलियन रोबोटिस्ट असून रोबोटिक्ससाठी कृतिवादी दृष्टिकोन लोकप्रिय करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. ब्रुक्स यांचे रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील योगदान निर्विवाद आहे.
त्यांचा जन्म ३० डिसेंबर १९५४ रोजी झाला. त्यांनी ऑस्ट्रेलियातून शुद्ध गणितात एम.ए. आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली. महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये संशोधन पदे भूषवून त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य सुरू केले. नंतर एमआयटीमध्ये ‘संगणक विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रयोगशाळेचे ते संचालक झाले.
ब्रुक्स यांनी संगणक दृष्टी, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स याविषयी अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यातला महत्त्वाच्या ‘एलिफंट्स डोन्ट प्ले चेस’ या शोधपत्रिकेत त्यांनी असा युक्तिवाद केला आहे की ‘रोबोटला दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी त्यात उच्च संज्ञानात्मक (कॉग्निटिव्ह) क्षमता अशा अमूर्त विचारसरणीचा समावेश असला पाहिजे. पर्यावरणासह प्रामुख्याने कृतीवर आधारित संवेदकाद्वारे हात-डोळा यांच्यात समन्वय असणे महत्त्वाचे. त्यांनी असे म्हटले आहे की त्याकरिता असे रोबोट तयार करणे आवश्यक आहेत जे दोन वर्षांच्या मुलाच्या सहजतेने वस्तूंचे वर्गीकरण करू शकतील ज्यांच्याकडे चार वर्षांच्या बालकाइतके भाषा कौशल्य असेल, सहा वर्षांच्या मुलाइतके हस्त कौशल्य असेल आणि आठ वर्षांच्या बालकाइतका त्याला सामाजिक सुसंवाद साधता येईल. मगच रोबोटमध्ये काही प्रमाणात संज्ञानात्मक क्षमता आली असे म्हणता येईल. अर्थात अजूनही आपण तिथपर्यंत पोहोचायला काही वर्षे जावी लागतील.
ब्रुक्स हे राष्ट्रीय माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान या ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार गटाचे सदस्य आहेत. टोयोटा संशोधन संस्थेच्या सल्लागार मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. ते रोबोटिक्स उद्याोजकही आहेत. अनेक रोबोटिक संस्थांचे संस्थापक, सह-संस्थापक किंवा मुख्य तांत्रिक अधिकारी आहेत. त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ‘नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनीयर्स’चे ते मानद फेलो आहेत.
सध्या ते भावनांना प्रतिसाद देणाऱ्या केआयएसएमटी या रोबोटवर काम करत आहेत. त्यात अनेक ठिकाणी दाब जाणून प्रतिसाद देणारे संवेदक बसवले आहेत. ज्या वेगाने रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रगती होत आहे त्या वेगाने डॉ. ब्रुक्स यांचा ‘भावनांना प्रतिसाद देणारा रोबोट’ लवकरच मूर्त स्वरूप घेईल याबद्दल खात्री वाटते.
– डॉ. अनला पंडितमराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org