कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ज्या क्षेत्रांत अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, अशी एक रसायनशास्त्राची उपशाखा म्हणजे गंधशास्त्र. एखाद्या रसायनाचा गंध कसा आहे, हे त्या रसायनातील रेणूंच्या रचनेवर अवलंबून असतं. सोपी रचना असलेल्या रेणूंच्या बाबतीत, त्या रसायनाचा गंध ओळखणं सोपं ठरू शकतं. परंतु गुंतागुंतीची रचना असलेल्या रेणूंच्या बाबतीत, त्या रसायनाचा गंध ओळखणं कठीण ठरतं. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केल्या गेलेल्या एका संशोधनाद्वारे आता, गुंतागुंतीची रचना असणाऱ्या विविध रेणूंचे गंध कसे असतील, हे ओळखण्यासाठी एक खात्रीशीर पद्धत शोधली गेली आहे.

हेही वाचा >>> कुतूहल: निल्स जॉन निल्सन

सदर संशोधनात, संशोधकांनी प्रथम ५५ परिचित गंधांची यादी केली. मधाचा गंध, मातीचा गंध, कस्तुरीचा गंध, जळकट गंध अशा विविध परिचित गंधांचा यांत समावेश होता. त्यानंतर या विविध गंधांशी जुळतील असे गंध असणाऱ्या पाच हजार रसायनांची त्यांनी निवड केली व या रसायनांच्या रेणूंच्या रचनेशी संबंधित विविध घटकांची नोंद केली. उदाहरणार्थ, त्या रेणूतील मूलद्रव्यांचे अणुक्रमांक, रेणूतील विविध अणूंचे एकमेकांतील रासायनिक बंध, त्या बंधांचा आकार, बंधांचा मजबूतपणा, बंधांचं स्थैर्य, इत्यादी. त्यानंतर या रसायनांचे गंध आणि त्यांच्या रेणूंच्या रचनेशी संबंधित घटक, यांतील परस्परसंबंध त्यांनी अभ्यासले. यांतून या संशोधकांना रसायनांचा गंध आणि रसायनांची रेणूरचना, यांत सुमारे अडीचशे प्रकारचे परस्परसंबंध आढळून आले. ही सर्व माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला पुरवण्यात आली. रेणूंच्या रचनेवरून रसायनाचा गंध ओळखायला ती सिद्ध झाली.

हेही वाचा >>> कुतूहल: हवामान अंदाजांतील ‘एआय’ची प्रचलित प्रणाली

पुढच्या टप्प्यात या संशोधकांनी वेगवेगळे गंध असणाऱ्या सुमारे सव्वातीनशे इतर रसायनांची निवड केली. तीक्ष्ण घ्राणेंद्रिय असणाऱ्या पंधरा स्वयंसेवक-व्यक्तींना या रसायनांचे गंध घेऊन त्यांची नोंद करायला सांगितलं. या नोंदींचं संख्याशास्त्रीय विश्लेषण केलं गेलं. या रसायनांचे गंध कोणते असावेत, हे या रसायनांतील रेणूंच्या रचनेवरून त्या प्रशिक्षित प्रणालीला ओळखायला सांगण्यात आलं. त्यानंतर प्रणालीने सांगितलेले गंध आणि त्या स्वयंसेवकांनी केलेल्या नोंदी, यांची तुलना केली गेली. जवळपास सर्व रसायनांच्या बाबतीत ही तुलना अगदी योग्यरीत्या जुळली. याचा अर्थ, प्रशिक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली रसायनातील रेणूंच्या रचनेवरून रसायनांचे गंध अचूकरीत्या सांगू शकत होता. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या संशोधनामुळे, आता नवनव्या रसायनांचे गंध त्यांच्या निर्मितीच्या अगोदरच ओळखता येतील; त्याचबरोबर एखाद्या विशिष्ट गंधाच्या निर्मितीसाठी, कोणत्या प्रकारचं रसायन निर्माण करावं लागेल, हेसुद्धा अगोदरच ठरवता येईल.

डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org