प्रत्येक मोठ्या शहराच्या व्यवस्थापनासमोर कायदा, सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न असतो. जेवढे शहर मोठे तेवढे गुन्हेगारीचे प्रमाण मोठे असू शकते असा एक अनुभव आहे. काही भाग व्यवस्थापनाच्या देखभालीच्या परिक्षेत्राबाहेर राहतो आणि त्याच भागात दंगल, भांडणे आणि मारामाऱ्या होतात. पण आता या सर्वच प्रश्नांची उकल करण्यासाठी अत्यंत बलवान असे अस्त्र व्यवस्थापनाला लाभले आहे ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. एआयच्या साहाय्याने गुन्ह्यांविषयीच्या विदांचे विश्लेषण करून होणारे गुन्हे टाळता येतात, अपघातात सापडलेल्यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेता येते.
शहरात रोज घडणाऱ्या गुन्ह्यांची ओळख आणि उकल करण्यास कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली साहाय्यभूत ठरते. कॅमेऱ्यांनी चित्रित केलेली क्षणचित्रे गुन्ह्याची पद्धत आणि गुन्हेगाराची वागणूक ओळखण्यास मदत करतात आणि त्याप्रमाणे सुरक्षितता प्रदान करता येते. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सुधारणा झाली. कारण गुन्हेगाराचा चेहरा आणि कपडे ओळखण्याची सुविधा त्यात असल्यामुळे गुन्हेगार शोधणे आता थोडे सोपे झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी जे सुरक्षा कॅमेरे बसवले आहेत त्यांनी मिळवलेल्या, नोंदवून ठेवलेल्या प्रचंड विदेचे विश्लेषण करून नेमके गुन्हेगार कोण आहेत ते शोधणे शक्य होते आणि कारवाई करता येते.
शिफारस किंवा सूचक प्रणालीच्या (रेकमंडेशन सिस्टम) मदतीने जिथे सर्वसाधारणपणे गुन्हे घडणार याची शक्यता प्रशासनाला जाणवते किंवा तशी माहिती मिळते तेव्हा लगेच त्या भागात प्रशासन गस्त पथक पाठवून वेळीच गुन्हे आटोक्यात आणू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित सूचक प्रणालीचा आणखी एक फायदा म्हणजे रस्ते अपघात फार मोठ्या प्रमाणावर कमी करता येतील. अनेक कॅमेरे बसवून, संवेदकांचे जाळे उभारून त्यांच्यापासून मिळणाऱ्या विदेचे विश्लेषण करून वाहतूक नियम मोडणारे, लेन तोडणारे यांच्यावर वेळीच कारवाई केली तर आपोआपच रस्ते अपघात कमी होतील. विदा अत्यंत महत्त्वाची आहे तिचा अभ्यास वेळोवेळी करून अगदी पुढील काही तासांत घडणाऱ्या घटनांचे इशारे मिळू शकतात आणि त्याआधारे प्रशासनाला प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे शक्य होते. यंत्र शिक्षण प्रणाली वापरून नवीन आणि कल्पक किंवा नावीन्यपूर्ण प्रारूपे निर्माण करून शहरात देखरेख ठेवता येते आणि शहरे सुरक्षित ठेवून शहरातील नागरिकांना सुरक्षितता बहाल करता येते.
-डॉ. किशोर कुलकर्णी