‘गूळ तेथे मुंगळे’ या वाक्प्रचारातील सत्य आर्थिक जगतात कायम ‘पैसा तिथे घोटाळे’ अशा स्वरूपात दिसून येते. मात्र आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हेच सत्य ‘घोटाळा ओळखा आणि टाळा’ अशा स्वरूपात बदललेले आहे. आजच्या संगणकीकृत, इंटरनेटशी जोडलेल्या, मोबाइलवर उपलब्ध असलेल्या आणि क्लाऊड-तंत्रज्ञानावर बेतलेल्या सर्व आधुनिक कंपन्या आणि संस्थांना तर अशा घोटाळ्यांचा मोठ्या प्रमाणात धोका असतो.

उदाहरणार्थ, २०२० मध्ये अमेरिकेतील सर्व विमा उद्याोगांना मिळून विविध घोटाळ्यांमुळे अंदाजे ३०८ बिलियन डॉलर्स (साधारण २४ लाख कोटी रुपये) गमवावे लागले. एका अंदाजानुसार अमेरिकेतील शेअर बाजारात होणारे घोटाळे दर वर्षी १०-४० बिलियन डॉलर्स इतक्या रकमेचे असतात. रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार भारतीय बँकांना घोटाळ्यांमुळे रोज साधारण १०० कोटी रुपयांचे नुकसान होते. घोटाळ्यांमुळे आर्थिक नुकसान तर होतेच, पण त्याचे अनेक दूरगामी दुष्परिणामसुद्धा असतात, जसे पत घसरणे, गुंतवणूकदारांचा आणि ग्राहकांचा विश्वास उडणे इत्यादी. अगदी व्यवसाय बुडूही शकतात. मग हे घोटाळे टाळायचे कसे?

हेही वाचा >>> कुतूहल: मॅक्युलोचपिट्स न्यूरॉन

‘घोटाळा’ म्हणजे साधारणपणे बेकायदा वा अनैतिक मार्ग वापरून एखाद्या आस्थापनेला फसवून त्यांचे पैसे, वस्तू किंवा सेवा मिळवणे. यात आपण दरोडे, हल्ले, चोऱ्या, हॅकिंग, घातपात, हेरगिरी, बौद्धिक संपदेचा गैरवापर, अपघात, अकार्यक्षमता, अयोग्य व्यावसायिक निर्णय वगैरेंचा समावेश करत नाही. घोटाळे हे वर-वर पाहता नियमित आणि सर्वसाधारण व्यवहार वाटतात, दिलेली माहिती व कागदपत्रे योग्य वाटतात, कार्यपद्धती व्यवस्थित पाळलेली असावी असे वाटते, पण अर्थातच त्यात काहीतरी काळेबेरे लपलेले असतेच. असे गैरव्यवहार करण्याची वृत्ती असलेल्या व्यक्ती सतत नवनवीन प्रकारचे घोटाळे आणि ते करायचे मार्ग शोधत असतात. म्हणून एखाद्या व्यावसायिक आस्थापनात घोटाळे झाले आहेत की नाही हे शोधणे किंवा घोटाळे होऊच नयेत अशा पद्धती अमलात आणणे कठीण असते. त्यातून, हल्लीच्या संगणकीकृत आस्थापनांमध्ये रोज लाखो क्लिष्ट व्यवहारांचा डेटा जमा होत असतो. अशा महाप्रचंड डेटाचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण करून घोटाळे शोधायचे म्हटले तर तिथे माणसाच्या मदतीला संगणक हवाच. या डोकेबाज घोटाळेबहाद्दरांना पकडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच संख्याशात्र, भाषाशास्त्र, संगणकीय अल्गोरिदम्स, डेटा मायनिंग, मशीन लर्निंग अशा अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ एकत्र येऊन काम करत आहेत. कसे, ते पुढच्या काही भागांत आपण पाहू.

गिरीश केशव पळशीकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org