‘‘माझ्या आयुष्यातील सोनेरी पान म्हणजे एक सामान्य मच्छीमार युवक मत्स्यशास्त्रज्ञ बनणे हे होय,’’ सदाशिव गोपाळ राजे यांचे हे कृतकृत्यतेचे उद्गार. राजे हे केंद्रीय समुद्री मत्स्यकीय संशोधन संस्थेतील निवृत्त मत्स्यशास्त्रज्ञ असून आजही वर्सोव्याच्या किनाऱ्यावर मत्स्य व्यवसाय करतात. वडिलांबरोबर मासेमारी करणारे राजे १९७६ मध्ये प्राणीशास्त्र व रसायनशास्त्र या विषयात पदवी मिळवल्यानंतर मोठय़ा भावाच्या आग्रहाखातर वर्सोव्यातील केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्थेच्या (सीआयएफई) आवारात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी गेले. परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
एका मच्छीमार तरुणाला मत्स्यवैज्ञानिक होण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडले होते. राजे गप्प बसणाऱ्यांतील नव्हते. डॉ. एस. एम. द्विवेदी या त्या वेळच्या संचालकामुळे त्यांना तेथे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला. डॉ. दत्तात्रय वामन बाळ आणि डॉ. सी. व्ही. कुलकर्णी हे दोन मराठी दिग्गज त्यावेळी सीआयएफईच्या संस्थापक सदस्यांपैकी होते. राजे यांनी सीआयएफईमध्ये मत्स्यविज्ञानाची पदविका घेतल्यानंतर त्यांची निवड प्रदर्शक/ वस्तुपाठक (डेमॉन्स्ट्रेटर) म्हणून करण्यात आली. पुढील पाच वर्षांत आपल्या अथक परिश्रमांनी आणि आपल्या मत्स्य व्यवसायातील शास्त्रीय अनुभवामुळे राजे मत्स्यवैज्ञानिक झाले. त्यांची नेमणूक कोची येथे केंद्रीय सागरी मत्स्यविज्ञान संशोधन (सीएमएफआरई) संस्थेत झाली. तेथे जवळपास ३० वर्षे वैज्ञानिक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केले. कास्थिमत्स्य प्रकारच्या माशांवर अधिकारवाणीने बोलणारे सदाशिव राजे यांचे ‘मरीन फिशरी रिसोर्स ऑफ इंडिया’ या पुस्तकातदेखील योगदान आहे. त्यांचे जवळपास ५०हून अधिक संशोधन निबंध निरनिराळय़ा मत्स्यविज्ञान संशोधन पत्रिकांत प्रसिद्ध झाले आहेत. आपल्या शास्त्रीय ज्ञानाचा स्थानिक मच्छीमार समाजाला पुरेपूर वापर व्हावा यासाठी ते नेहमीच तळमळीने कार्य करत असतात. आजदेखील निवृत्तीनंतर सीआयएफईच्या समितीवर सभासद म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
मच्छीमार हा महासागराभोवती निर्माण होणाऱ्या संस्कृतीचा अविभाज्य घटक ठरतो. केवळ चरितार्थासाठी महासागराकडे न पाहता त्याचा शास्त्रीय अभ्यास करणारे हे ‘मस्त्यवैज्ञानिक मच्छीमार’ त्यांच्या पत्नी जयश्री यांच्यासमवेत मच्छीमार महिलांचे अनेक व्यावसायिक प्रश्न सोडवण्यातदेखील पुढाकार घेतात.
– डॉ. नंदिनी विनय देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org