भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे मोठे परिवर्तन झाले आहे, होत आहे. भारत जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान बाजारांपैकी एक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातून संधी उपलब्ध होतील, तसेच नवी आव्हानेही स्पष्ट होत राहतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात गेल्या दशकात अनेक कृत्रिम बुद्धिमत्ता-केंद्रित स्टार्टअप उभे राहिले आहेत. या कंपन्या आरोग्य सेवांमध्ये रुग्ण निदानापासून औषधे पोचवणे, वित्त सेवांमध्ये गुंतवणूक मार्गदर्शन ते व्यवहार सुकरता, कृषी उत्पादनक्षमतेत सुधारणा, व्यक्तीनुरूप शिक्षण या क्षेत्रात आहेत. काही कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता -चालित तंत्रांचा वापर, वैद्याकीय इमेजिंग विश्लेषणासाठी आणि काही स्तन कर्करोग तपासणीसाठी करतात. उद्याोगांची सुरुवातीला काळजी घेणारी व्यवस्था अस्तित्वात आली आहे. स्टार्टअप्सना त्यांच्या नवकल्पनांना विकसित करण्यासाठी आवश्यक संसाधने आणि मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.

वृद्ध परिचर्या, कृषीआधारित उद्याोग, भरड धान्यांचे नवीन पदार्थ शोधणे, तंत्रज्ञानाशी मिलाफ करून स्वस्तात टिकाऊ पदार्थ निर्माण करणे इत्यादी विविध क्षेत्रांत प्रगती नजीकच्या भविष्यकाळात अपेक्षित आहे. व्यवस्थापनात आणि मोठ्या उद्याोगात सुसूत्रता आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जात आहे, त्याचबरोबर या आस्थापनांच्या भावी गरजा शोधून त्यासाठी कोणत्या प्रकाराने प्रशिक्षण द्यावे हेसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केले जाईल. प्रशासनामध्ये मोठे बदल हे माहिती संकलन, वर्गीकरण आणि योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे या दिशेने होऊ लागले आहेत. नजीकच्या भविष्यकाळात येऊ घातलेल्या जनगणनेच्या आधारे विश्लेषण, सादरीकरण, निष्कर्ष यात महत्त्वाची भूमिका कृत्रिम बुद्धिमत्तेची असणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीचे परवडणाऱ्या किमतीतील तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विकसित केले जाणे आवश्यक आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तांत्रिक क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. सर्वसामान्य लोकसुद्धा चॅट जीपीटी, स्मार्ट फोन, जाहिराती, ओटीटी चित्रफिती आदीमार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरत आहेत.

आजमितीस कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण आणि त्याचे उपयोग हे मोठ्या शहारात केंद्रित झाले आहेत ते लवकरात लवकर ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अनेक विद्यापीठे आणि संस्थांनी अभ्यासक्रमांत कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय समाविष्ट करायला सुरुवात केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ज्ञान, वापर सर्वत्र होण्याची सुरुवात या शिक्षणाने झाली आहे. देशातील सर्वात गरीब आणि वंचित व्यक्तीचे आयुष्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगाने सुधारावे, या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

प्रा. किरण बर्वे

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal the journey of artificial intelligence in india amy