यंत्रमानव (रोबॉट) म्हणजे एखादी साधी किंवा गुंतागुंतीची क्रिया करण्यासाठी प्रोग्रॅम केलेलं यंत्र! यंत्रमानव कुणाला म्हणायचं याचे काही निकष आहेत. जे यंत्र हालचाल करू शकतं; स्वतंत्रपणे काम करू शकतं; ज्याला दृष्टी, स्पर्श, आवाज अशा संवेदना असतात; ज्या यंत्राला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव असते आणि ज्या यंत्राला माणसासारखी बुद्धी असल्याचं आपण मानतो अशा यंत्राला यंत्रमानव मानलं जातं.
अगदी सुरुवातीला यंत्रमानवाचा कारखान्यांमध्ये वापर मुख्यत्वे डर्टी, डल, डेंजरस (३-डी) अशा तीन प्रकारची कामं करण्यासाठी होऊ लागला. जी कामं करण्याची माणसांना किळस वाटू शकते, कंटाळा येऊ शकतो किंवा ज्या कामांमध्ये माणसांना धोका असू शकतो ती कामं यंत्रमानवानं कारखान्यांमध्ये करावीत या उद्देशानं ते विकसित केले गेले.
कारखान्यात माणसं जी कामं हाताने करतात ती कामं करण्यासाठी औद्याोगिक यंत्रमानव वापरले जातात. त्यांना मानवी हातांसारखे दिसणारे यांत्रिक हात असतात. यांना मॅनिप्युलेटर म्हणतात. मानवी हात जसा कोपरात वाकवता येतो तसे हे मॅनिप्युलेटर पाच किंवा सात कोनांतून वाकवता येतात. आपल्या हाताला जसं पंजा असतो तसा यंत्रमानवाला जो पंजा असतो त्याला ‘एन्ड इफेक्टर्स’ म्हणतात. कारखान्यात कामगार पंजा वापरून जी वेल्डिंग, मार्किंग, ड्रिलिंग, कटिंग अशी कामं करतात तशी कामं एन्ड इफेक्टर्समुळे करता येऊ लागली.
यंत्रमानवाचा मुख्य घटक असतो ‘कंट्रोलर्स’! हे कंट्रोलर्स त्यांचा मेंदूच असतो. हा एक संगणकच असतो. याच्यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन्ही भाग असतात. यंत्रमानवाच्या संपूर्ण हालचालींचं नियंत्रण कंट्रोलर्स करतात. आपल्या मेंदूला ज्या प्रकारे डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ ही पाच इंद्रियं सभोवतालची माहिती पुरवतात तसंच यंत्रमानवामधले ‘फीडबॅक डिव्हायसेस’ हे घटक यंत्रमानवाच्या मेंदूला म्हणजेच कंट्रोलर्सना सभोवतालची माहिती पुरवतात.
यंत्रमानवाच्या संपूर्ण हालचालींचं नियंत्रण कंट्रोलर्स करतात. मॅनिप्युलेटर्सनी कधी हालचाल करायची, एन्ड इफेक्टर्सनी एखादी गोष्ट कधी पकडायची, फीडबॅक डिव्हायसेसकडून आलेल्या माहितीवर प्रक्रिया कधी करायची असे सगळे निर्णय कंट्रोलर्स घेतात आणि यंत्रमानव काम करण्यास सज्ज होतो. यात त्यांना मदत करतात ते ‘लोकोमोटिव्ह डिव्हायसेस’ म्हणजे चालना देणारी साधनं किंवा घटक! कंट्रोलर्सकडून आलेल्या सूचनांप्रमाणे यंत्रमानव आवश्यक ती कामगिरी या लोकोमोटिव्ह डिव्हायसेसच्या मदतीनं करतात.
आज यंत्रमानव शास्त्रात प्रचंड क्रांती झाली आहे. यामागे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात झालेली प्रगती आहे. यामुळेच कारखान्यातल्या सुरुवातीच्या ताकदीच्या आणि तांत्रिक ‘३-डी’ कामांबरोबरच आजचे यंत्रमानव नोंदी ठेवणं, देखरेख करणं, हिशेब ठेवणं, माहिती गोळा करून तिचं विश्लेषण करणं अशी डोक्यानं करायची कामंही सहज करतात.
माधवी ठाकूरदेसाई