आपण ज्या मूलद्रव्यांना ‘दुर्मीळ मृत्तिका’ म्हणतो, त्या मूलद्रव्यांची खनिजे २०१० मध्ये अचानक प्रकाशझोतात आली. त्यापूर्वी त्या खनिजांच्या खाणींमधील आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या उद्याोगांमधील लोकांव्यतिरिक्त इतरांनी त्यांचे नावही कधी ऐकले नव्हते. अनेक दशकांपासून आधुनिक तंत्रज्ञानातील त्या खनिजांची अपरिहार्यता तंत्रज्ञांच्या लक्षात आली होती. तरीही त्या खनिजांना म्हणावे तितके महत्त्व दिले गेले नव्हते. आणि एकाएकी जगभरात त्यांना ‘महत्त्वाची आणि धोरणात्मक खनिजे’ म्हणून गणले जाऊ लागले. याचे कारण आहे चीन- दुर्मीळ मृत्तिकांच्या खनिजांचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक आणि निर्यातक देश! जगातली बहुतेक राष्ट्रे दुर्मीळ मृत्तिकांसाठी चीनवर अवलंबून आहेत.
२०१० पासून या खनिजांच्या निर्यातीवर चीनने नियंत्रणे लादून त्यांच्या पुरवठ्याच्या साखळीत कृत्रिम तुटवडा निर्माण करून किमतीत अतोनात वाढ केली. याचा चीनकडून ती खनिजे आयात करणाऱ्या राष्ट्रांच्या महत्त्वाच्या उद्याोगांवर आणि पर्यायाने त्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला.
दुर्मीळ मृत्तिकांच्या खनिजांची मागणी वाढत असल्याने ही खनिजे ज्या खडकांमध्ये आढळतात त्या खडकांना आणि ते खडक ज्या देशांमधे आढळतात त्या देशांना खूपच महत्त्व प्राप्त झाले. कोणत्याही खनिजाचे भौगोलिक वितरण जगभरात सर्वत्र सारखे नसते. खनिजांच्या साठ्यांची निर्मिती वेगवेगळ्या खडकांमध्ये भूवैज्ञानिक कारणांनी झालेली असते. कार्बोनटाइट नावाच्या अग्निजन्य (इग्नीअस) खडकात हे साठे सापडण्याची शक्यता अधिक असली, तरी ग्रनाइट आणि काही अल्कयुक्त अग्निजन्य खडकांमध्ये; तसेच काही अवसादी (सेडिमेंटरी) खडकांतही या खनिजांचे साठे आढळतात. दुर्मीळ मृत्तिकांच्या खनिजांचे सर्वात जास्त साठे चीनमध्ये आहेत. अमेरिकी संघराज्ये, ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही या खनिजांचे साठे आहेत; परंतु चीनच्या साठ्यांच्या तुलनेत ते खूपच लहान आहेत.
भारतातही या खनिजांचे साठे किनारपट्टीच्या पुळणींमधल्या वाळूमध्ये मोनाझाइट खनिजाच्या वाळूच्या कणांच्या रूपात, तसेच गुजरात आणि राजस्थानमध्ये कार्बोनटाइट पाषाणाच्या रूपात आहेत. परंतु त्यांचे उत्पादन जागतिक उत्पादनाच्या तुलनेत अत्यल्प आहे. याशिवाय दुर्मीळ मृत्तिकांचे एकाच खनिजात असणारे धातू वेगळे काढण्यासाठीचे आणि पुढे त्यांच्या शुद्धीकरणासाठी लागणारे प्रगत तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध नाही. पाश्चिमात्य देशांनी आणि भारताने आता पुरवठा साखळीवरील चीनचा प्रभाव, तसेच त्या देशावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी दुर्मीळ मृत्तिकांच्या खनिजांच्या नव्या साठ्यांचा शोध घेण्यावर, नवीन खाणींच्या विकासावर आणि अन्य उपाययोजनांवर भर दिला आहे.
– अरविंद आवटी, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org