कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून चोरीसारखी वाईट कृत्येही केली जातात. अलीकडेच शर्विलकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग संगणक आज्ञावली पुरवठा साखळीवर (सप्लाय चेन) हल्ल्यासाठी केला. कसा ते पाहू या.
माहिती तंत्रज्ञान आणि नेटवर्क क्षेत्रात पायाभूत सुविधा सुव्यवस्थित राखण्यासाठी संगणक आज्ञावली विकसित करणारी एक अमेरिकी कंपनी आहे. ‘फार्च्यून ५००’ कंपन्यांच्या यादीमधील सुमारे ४५० कंपन्या तिच्या ग्राहक आहेत. यातून तिच्या नावलौकिकाचा अंदाज येतो. ही कंपनी आपल्या आज्ञावली प्रणाल्या अद्ययावत करण्याची आणि त्यांना नवनवीन पर्याय जोडण्याची प्रक्रिया अव्याहतपणे करत असते. जेव्हा अशी नवी प्रणाली सर्व कसोटय़ांवर पात्र ठरते तेव्हा तिच्याबद्दल ग्राहकांना सूचना दिल्या जातात. ग्राहक कंपन्या त्यांच्या प्रमाणित कार्यविधीनुसार नवी प्रणाली डाउनलोड करून त्यांच्या नेटवर्कमध्ये तिचा समावेश करतात. ही प्रकिया समजून घेऊन जर नव्या प्रणालीत शर्विलकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली प्रणाली बेमालूमपणे समाविष्ट केली तर, ग्राहकांकडची सुरक्षा साधने उदाहरणार्थ फायरवॉल, आयपीएस आणि अँटीव्हायरस अशा प्रणाल्यांना गुंगारा देऊ शकतात. त्यामुळे ग्राहकाच्या संगणकांतील विदा चोरणे याशिवाय त्याच्या संपूर्ण नेटवर्कवर कब्जा मिळवायचा बेत यशस्वी होऊ शकतो; प्रत्यक्षात हेच घडले.
साधारणपणे ज्या कंपनीची आज्ञावली आपण वापरत असतो तिला अद्ययावत करण्यासाठी आपण त्याच कंपनीवर अवलंबून असतो. मग तशी सूचना मिळाली की जास्त विचार न करता आपण ती डाउनलोड करून आपली प्रणाली अद्ययावत करतो. हा विचार केंद्रस्थानी ठेवून शर्विलकांनी योजना आखली. त्यांनी कोणत्याही संगणक जाळय़ांवर सरळ हल्ला केला नाही. उलट वापरकर्त्यांना आज्ञावली पुरवणाऱ्या सदर कंपनीच्या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कुठलाही संशय येणार नाही अशा पद्धतीने शिरकाव केला.
जवळपास १८ हजार ग्राहकांनी नवी प्रणाली डाउनलोड केली कारण त्यांना त्याबद्दल मिळालेला संदेश संशयास्पद नव्हता. अशा प्रकारे शर्विलकांनी त्या ग्राहकांच्या संगणक जाळय़ात प्रवेश करून त्यांतील गोपनीय आणि संवेदनशील माहिती चोरून गैरफायदा घेतला. कृत्रिम बुद्धिमत्तेने आखलेली शर्विलकांची पहिली खेळी आणि संसर्गित प्रणालीचा प्रसार यात तब्बल ६ महिने गेले आणि एका वर्षांनंतर हा हल्ला उघडकीला आला.
भविष्यात असे हल्ले अधिक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून होऊ शकतात. तरी खबरदारी बाळगून आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरूनच त्यांचा शोध आणि प्रतिकार करण्याचा विचार केला पाहिजे.
– वैभव पाटकर,मराठी विज्ञान परिषद