संजीव तांबे
नैसर्गिक भाषा संस्करणात विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारची विशाल भाषा प्रारूपे विकसित करण्यात आली आहेत. या प्रारूपांचे वैविध्यपूर्ण प्रकार, त्यांचे उपयोग आणि उदाहरणे यांची माहिती अत्यंत रोचक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिगामी (ऑटोरिग्रेसिव्ह) प्रारूपे, जसे ‘जीपीटी’ मालिका, अनुक्रमाने आधीचे शब्द विचारात घेऊन पुढील शब्दाचा अंदाज लावतात आणि सुसंगत व अर्थपूर्ण मजकूर तयार करतात. याउलट, अनेक-बहुलकी (मल्टीमोडल) प्रारूपे, जसे की ‘चॅटजीपीटी-४’ आणि ‘जेमिनी’ चॅटबॉट मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि व्हिडीओ अशा विविध प्रकारच्या सामग्रीवर प्रक्रिया करू शकतात आणि त्यांची निर्मितीही करू शकतात.

बहुभाषिक (मल्टी-लिंग्वल) प्रारूपे, उदाहरणार्थ, ‘मेगाट्रॉन-ट्यूरिंग एनएलजी’, अनेक भाषांमध्ये काम करू शकतात, ज्यामुळे ती आंतरभाषिक माहिती संकलन आणि भाषांतर यांसारख्या कार्यांसाठी उपयुक्त ठरतात. परिवर्तक-आधारित (ट्रान्सफॉर्मर-बेस्ड) प्रारूपे, जसे की ‘बर्ट’ आणि ‘जीपीटी’ मालिका, दीर्घ लांबीच्या मजकुरांतील घटकांमधील परस्परसंबंध समजून घेऊन भाषांतर, सारांश काढणे आणि प्रश्नोत्तरे यांसारखी कार्ये प्रभावीपणे करू शकतात.

पूर्व-प्रशिक्षित (प्री-ट्रेन्ड) आणि सूक्ष्ममेलित (फाईन-टयून्ड्) प्रारूपे, जसे ‘बर्ट’ आणि ‘मिस्ट्रल’, विशिष्ट कार्यांसाठी अनुकूलित केली जातात. उदाहरणार्थ, वैद्याकीय अहवालनिर्मिती किंवा कायदेशीर दस्तावेजांचे विश्लेषण करणे. विशिष्ट कामांसाठी प्रारूपाला सुरुवातीपासून वेळखाऊ प्रशिक्षण देण्यापेक्षा पूर्व-प्रशिक्षित प्रारूपाचे सूक्ष्ममेलन केल्यास संगणकीय संसाधने आणि वेळेची बचत होते. संकरित (हायब्रीड) प्रारूपे, जसे ‘युनिएलएम’ विविध प्रकारच्या विशाल भाषा प्रारूपांचे एकत्रीकरण करून एकत्रित (संकरित) प्रारूपाला अधिक शक्तिशाली बनवतात.

सूचना-केंद्रित (इन्स्ट्रक्शन फोकस्ड्) प्रारूपे, जसे की ‘जीपीटी-३’ आणि ‘जेमिनी-१.५ प्रो’, वापरकर्त्याने दिलेल्या विशिष्ट लघुसूचनेचे (प्रॉम्प्ट) आकलन करून अचूक प्रतिसाद देतात. ही प्रारूपे भावना विश्लेषण, मजकूर निर्मिती आणि संगणक कोडिंग यासारख्या कार्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात. संभाषण-केंद्रित (कॉन्व्हर्सेशन फोकस्ड्) प्रारूपे, जसे की ‘जीपीटी-३.५’ आणि ‘बर्ट’, संवादामध्ये पुढील प्रतिसाद काय असावा याचा अंदाज लावून वापरकर्त्याबरोबर नैसर्गिक संभाषण करू शकतात, ज्यामुळे ते चॅटबॉट्स आणि आभासी साहाय्यक म्हणून उपयुक्त ठरतात.

या सर्व प्रकारच्या विशाल भाषा प्रारूपांमुळे नैसर्गिक भाषा संस्करणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले आहेत. त्यांच्या विविध क्षमता आणि उपयोगांमुळे ही प्रारूपे विविध क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देत आहेत, त्यामुळे मानवी भाषेचे आकलन आणि निर्मिती यांच्या क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण होत आहेत.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal types of large language formats amy