कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या चॅटजीपीटीसारख्या प्रणाली कृत्रिम न्युरल नेटवर्क वापरून तयार केल्या आहेत. माहितीमहाजालावर असलेल्या प्रचंड माहितीचा अभ्यास करून त्या शिकतात. चॅटबॉट्सचा वापर करून हे तंत्रज्ञान आपली पत्रे लिहून देण्यापासून ते चक्क भाषणे, कविता, कथा, निबंध, लेख लिहून देण्यापर्यंतची अनेक कामे करत आहे. यात ट्रान्सफॉर्मर व विशाल भाषा प्रारूप वापरण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँकिंग क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारात सामान्य मानवी चुका दूर करणे आणि मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नसलेले व्यवहार हाताळण्यासाठी यशस्वीरीत्या चॅटबॉट्सचा वापर केला जात आहे. बँकेत नोंदवलेल्या भ्रमणध्वनीवरून बँकेने दिलेल्या दूरध्वनी क्रमांकांवर विचारणा केल्यास लगेच बँक खात्यातील रक्कम मौखिक आणि लेखी स्वरूपात कळते. यात यंत्र शिक्षणाचा वापर केला जातो.

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाब्दिक संवाद

गूगल ट्रान्सलेट ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली वापरून एका भाषेतील लिखित स्वरूपातील उताऱ्याचे दुसऱ्या भाषेत झटकन भाषांतर करणे सहज शक्य झाले आहे. देश-विदेशातील अनेक भाषांचे पर्याय तेथे उपलब्ध आहेत. यात अचूक भाषांतर करण्यासाठी यंत्र शिक्षणाचा वापर केला जातो. शिवाय यात उच्च गुणवत्तेचे भाषांतर त्याच क्षणी (रिअल टाइममध्ये) करण्यासाठी प्रगत न्युरल मशीन भाषांतर प्रणाली विकसित केली आहे.

गूगल सर्चचा वापर केल्याने आपल्याला हवी असलेली माहिती क्षणार्धात लेखी स्वरूपात उपलब्ध होते. जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता, सखोल शिक्षण तंत्रज्ञान, मल्टिटास्क युनिफाइड भाषा प्रारूप यांचा यात वापर होत असल्याने अधिक जलद आणि योग्य शोध परिणाम प्राप्त होतात.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे आपण इंग्रजी भाषेतून केलेल्या लिखाणात व्याकरण, स्पेलिंग, वाक्यरचना यात चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातात. व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होतो. एखाद्या ब्रँडची जाहिरात करायची असते तेव्हा लेखकांना नेमके, मोजके शब्द सुचविले जातात. त्यासाठी लागणाऱ्या हेडलाइन, टॅगलाइन व घोषणा लिहिण्यासाठी मदत केली जाते. हे सर्व भाषा प्रक्रियेची प्रारूपे वापरल्याने साध्य होते.

आपण जेव्हा एखादा संदेश मोबाइलवर टाइप करत असतो, तेव्हा एक शब्द टाइप केल्याबरोबर त्यापुढील संभाव्य शब्दपटलावर (स्क्रीनवर) दिसू लागतो. जसे ‘वाढदिवसाच्या’ या शब्दानंतर ‘हार्दिक’ व त्यानंतर ‘शुभेच्छा’ असे शब्द सुचविले जाते. यासाठी नैसर्गिक भाषा प्रक्रियेची तंत्रे वापरली जातात. यंत्रांना प्रचंड प्रमाणात विदा पुरवावी लागते ज्यायोगे भाषा प्रक्रियेची प्रारूपे योग्य निष्कर्ष काढतात.

– डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal using artificial intelligence to write a dialogue