डॉ संजीव तांबे
विशाल भाषा प्रारूपे (लार्ज लँग्वेज मॉडेल्स) हा आधुनिक तंत्रज्ञानातील एक क्रांतिकारक शोध आहे. यांचे उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. भाषांतर आणि लेखन या क्षेत्रांमध्ये ही प्रारूपे अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. लेख, लघुकथा, स्क्रिप्ट्स, सर्वेक्षणे, सारांश, बातम्या, गाणी, व्याख्याने आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट्स अशा विविध प्रकारच्या लिखित सामग्रीची निर्मिती करण्यासाठी ही प्रारूपे वापरली जातात. शिवाय, ‘गूगल सर्च’ आणि मायक्रोसॉफ्टच्या ‘बिंग’सारख्या संकेतस्थळांना पर्यायी शोध साधन म्हणूनही यांचा वापर केला जातो. ग्राहक सेवा क्षेत्रातही विशाल भाषा प्रारूपांचा वापर वाढत आहे. आभासी साहाय्यक म्हणून ही प्रारूपे ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि तक्रारीसुद्धा स्वीकारतात.

संगणक जगतात विशाल भाषा प्रारूपांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही प्रारूपे संगणक जाळ्यावरील सायबर हल्ले ओळखून त्वरित इशारा देऊ शकतात. विविध प्रोग्रॅमिंग भाषांमध्ये संगणक कोड तयार करणे, त्यातील चुका शोधणे आणि दुरुस्त करणे यांसाठीही त्यांचा वापर केला जातो. ऑडिओ किंवा व्हिडीओ फाइल्सचे अचूकतेने लिखित मजकुरात रूपांतर करणे, मोठ्या डेटासंचांचे विश्लेषण करून त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष काढणे, बाजार संशोधन करणे अशी अनेक कामे विशाल भाषा प्रारूपे कुशलतेने पार पाडतात. विशिष्ट लक्ष्यगटासाठी आकर्षक सामग्री तयार करणे आणि मजकुरातील भावना ओळखून बाजारातील कल समजून घेणे या कामांकरिताही या प्रारूपांचा वापर केला जातो.

शिक्षण, संशोधन आणि विज्ञान या क्षेत्रांमध्येही विशाल भाषा प्रारूपांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या शैलीनुसार त्यांना मार्गदर्शन करणे, दस्तऐवजांचे वर्गीकरण करणे, डेटाचे विश्लेषण करणे व त्यानुसार गणिती प्रतिमान तयार करणे अशी कामे विशाल भाषा प्रारूपे करू शकतात.

जीवशास्त्रात नवीन रेणूंच्या रचनेचे भाकीत करणे, कायदा संबंधित परिभाषेचे आकलन करून त्या क्षेत्रातील व्यावसायिकांना लेखनात मदत करणे, वैज्ञानिक संशोधनात शोधनिबंधाचा सारांश काढणे, नवीन संशोधन कल्पना सुचविणे व वैज्ञानिक ग्रंथ व शोधनिबंध लिहिणे अशा अनेक मार्गांनी विशाल भाषा प्रारूपे ज्ञानाच्या क्षेत्रात योगदान देत आहेत. याशिवाय, प्रतिमांसाठी वर्णनात्मक मथळे तयार करणे, संगीत रचना करणे, कला व डिझाईनमध्ये नवीन कल्पना सुचवणे, उत्पादने व सेवांची वर्णने लिहिणे, विपणन व जाहिरात सामग्री तयार करणे, व्हिडीओ गेम्स निर्माण करणे, समुपदेशन करणे आणि ऑनलाइन बातम्यांची सत्यता तपासणे अशी विविध कामे विशाल भाषा प्रारूपे कार्यक्षमतेने पार पाडू शकतात.