भरुच शहरातल्या एका पारशी तरुणाला अगदी तरुण वयातच हिमालयातल्या पाषाणसमूहांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यांचे नाव होते दाराशॉ नोशेरवान वाडिया. वडोदऱ्यातून स्नातकोत्तर पदवी प्राप्त केल्या केल्या १९०७ मध्ये जम्मूच्या महाविद्यालयात भूविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी जम्मूतील खडकांचा अभ्यास सुरू केला. हिमालयाच्या भूविज्ञानात त्यांना कमालीचे स्वारस्य वाटू लागले. १९२० मध्ये त्यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागात निवड झाली. तिथे त्यांना हिमालयाच्या काही भागांचे अधिक सखोल सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली.

१९६० च्या दशकात खास हिमालयाचा भूवैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी एखादी संशोधन संस्था सुरू करण्याचा विचार काही लोकांनी सुरू केला, त्यात वाडियांचे नाव अग्रस्थानी होते. १९६८ मध्ये ही संस्था ‘भारतीय हिमालयन भूविज्ञान संस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी) या नावाने स्थापन झाली. संस्थेची सुरुवात दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पतीविज्ञान विभागातल्या दोन खोल्यांत झाली. स्वत: वाडिया या संस्थेचे पहिले मानद संचालक होते. ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून काम पाहते. हिमालयातल्या भूवैज्ञानिक संसाधनांचा शोध घेण्याचे काम ही संस्था करते.

संस्थेच्या ‘सत्येश्वर प्रसाद नौटियाल संग्रहालया’त हिमालयाचा भूवैज्ञानिक इतिहास दाखविणाऱ्या प्रतिकृती; तिथले खडक, जीवाश्म, खनिजे, यांचे नमुने उचित माहितीसह पाहायला मिळतात. हिमालयाच्या भूगर्भात अगदी खोल होणाऱ्या हालचाली मनोवेधक पद्धतीने दाखवल्या आहेत. हिमालयाच्या पर्यावरणातल्या मानवी हस्तक्षेपाच्या परिणामांची विचार करायला लावणारी भित्तिचित्रे आणि हिमालयाची भव्य प्रतिकृती ही या संग्रहालयाची वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांसाठी हे संग्रहालय एक अभ्यास केंद्रच झाले आहे.

४ जुलै २००९ रोजी हिमालयातील हिमनद्यांचा आणि बर्फाचा अभ्यास करण्यासाठी संस्थेत ‘हिमविज्ञान केंद्र’ (दी सेंटर फॉर ग्लेशिऑलॉजी) या विशेष विभागाची स्थापना करण्यात आली. वातावरण बदलाचा हिमनद्यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून भविष्यकालासाठी धोरणे आखण्याची जबाबदारी सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या केंद्रांवर सोपवली आहे.

डॉ. वाडिया भारतीय भूविज्ञानातील महान व्यक्तिमत्त्व होते. हिमालयाच्या भूविज्ञानाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी श्रीलंकेचे सरकारी खनिजवैज्ञानिक, तसेच भारत सरकारचे खनिज सल्लागार ही पदेही भूषवली होती. केंद्र शासनाने त्यांना पद्माविभूषण पुरस्काराने गौरविले होते. त्यांच्या गौरवार्थ १९७६ मध्ये संस्थेचे नामकरण ‘वाडिया हिमालय भूविज्ञान संस्था’ असे करण्यात आले. संस्थेचे स्वत:चे स्वायत्त शैक्षणिक केंद्र असून तिथे भूविज्ञानातल्या उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या सुविधा पुरवल्या जातात.

कविता भालेराव

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader