शेअर बाजारातील व्यवहार उचित पद्धतीने व्हावेत (फेअर ट्रेडिंग) अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी बरेच नियमही असतात. सर्क्युलर ट्रेडिंग/ प्राइस मॅनिप्युलेशन या प्रकारच्या घोटाळ्यांत काही लोक एकत्र येऊन शेअरची किंमत अतिशय कमी असलेली (‘पेनी स्टॉक’), अत्यंत कमी व्यवहार होत असलेली एखादी कंपनी निवडून त्या कंपनीच्या शेअरचे आपसातच खूप वेळा चढत्या किमतीने व्यवहार करतात. त्यामुळे हळूहळू इतर लोकांचे लक्ष वेधले जाते आणि तेही असे व्यवहार करू लागतात. किंमत पुरेशी वाढली की मग हे मूळ लोक आपले शेअर विकून बराच नफा कमावतात. त्यानंतर शेअरची किंमत लवकरच मूळ पदाला येऊन पोहोचते आणि इतरांचे नुकसान होते. किंमत फुगवण्यासाठी अशा प्रकारे आपसात संगनमत करून कृत्रिमपणे मागण्या निर्माण करणे हा एक मार्ग झाला. हा घोटाळा संगणकपूर्व काळात जास्त होत असे. असे घोटाळे पकडणे अवघड असते. कारण कोणत्या व्यक्ती, किती जण, कोणती कंपनी, कुठला कालावधी, व्यवहार करण्याचे डावपेच याविषयी काहीच माहीत नसते. प्रत्येक एकेकटा व्यवहार योग्यच असतो; त्यांच्यातील सूत्र शोधल्याशिवाय घोटाळा दिसत नाही. असे घोटाळे शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम्स तयार केले जातात.

सध्या शेअर बाजाराशी संबंधित एक नवीन तंत्रज्ञान उदयास आले आहे ते म्हणजे अल्गोरिदमिक ट्रेडिंग, ज्यात संगणक वापरून एका सेकंदात खरेदी-विक्रीच्या लाखो मागण्या नोंदविता, बदलता आणि रद्दही करता येतात. या मागण्यांचे तपशील स्वयंचलितपणे ठरवण्यासाठी, म्हणजे कोणती कंपनी, शेअरची संख्या आणि अपेक्षित किंमत ठरविण्यासाठी अत्यंत प्रगत अल्गोरिदम्स आहेत. या तंत्रज्ञानामुळे शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये बेकायदा फेरफार करणे शक्य असते. म्हणून सर्व मागण्यांवर पाळत ठेवून बाजारात कोणी कोणत्याही प्रकारे काही छेडछाड तर करत नाही ना, हे ठरविणे आवश्यक असते. पण कसे? कारण ही छेडछाड अनेक प्रकारे होऊ शकते आणि या प्रकारांविषयी आधीच माहीत असेलच असेही नाही.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal watch out for malpractices in the stock market amy
First published on: 04-07-2024 at 05:49 IST