३० नोव्हेंबर २०२२ हा दिवस कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतिहासात मैलाचा दगड मानला जातो. या दिवशी सॅन फ्रान्सिस्को-स्थित ‘ओपनएआय’ कंपनीने ‘चॅटजीपीटी’ ही संगणक प्रणाली प्रस्तुत केली आणि तिच्या क्षमतांनी जग आश्चर्यचकित झाले. चॅटजीपीटीला ‘विशाल भाषा प्रारूप’ (लार्ज लँग्वेज मॉडेल) या संज्ञेने ओळखले जाते. या प्रारूपांचा ‘निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (जनरेटिव्ह एआय)’ या गटात अंतर्भाव होतो; कारण ती नवीन सामग्री निर्माण करू शकतात. मूलत: ही प्रारूपे म्हणजे गणिती संरचना असतात. मोठ्या प्रमाणावरील मजकूरयुक्त डेटावर प्रक्रिया करून मानवी भाषांना समजण्याची आणि त्यावर आधारित सामग्री निर्मितीची त्यांची क्षमता असते. विशाल भाषा (वि.भा.) प्रारूपांचे प्रारंभिक स्वरूप म्हणजे काही दशकांपूर्वीची, वाक्यातील काही शब्द पाहून त्यापुढील शब्दाचे भाकीत करणारी नैसर्गिक भाषा संस्करण (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) प्रणाली!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणिती दृष्ट्या वि.भा. प्रारूपांमध्ये अब्जावधी घटकांचा समावेश असतो, म्हणून त्यांना ‘विशाल’ म्हटले जाते. कामासाठी तयार झालेल्या प्रारूपाला प्रशिक्षण द्यावे लागते. यासाठी एक महाकाय आकाराचा डेटासंच वापरला जातो, ज्यामध्ये विविध भाषांमधील लेख, विश्वकोश, कथा, कादंबऱ्या, ललित लेख, समाजमाध्यमांवरील मजकूर, संगणक कोड्स इत्यादींचा समावेश असतो. अब्जावधी शब्द (टोकन्स) प्रशिक्षण संचामध्ये सामावलेले असतात. आकाराने विशाल असल्याने प्रारूपाला मोठी माहिती ग्रहण आणि डेटा संस्करण क्षमता प्राप्त होते. या प्रारूपांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘सखोल यंत्र शिक्षण (डीप मशीन लर्निंग)’ पद्धतींचा वापर केला जातो; हे खर्चिक काम असते, कारण त्यात वेगवान आणि समांतरपणे काम करू शकणाऱ्या हजारो संगणक चिप्सचा वापर केला जातो. अशा चिप्सच्या निर्मितीत एनव्हिडिया ही कंपनी अग्रस्थानी आहे.

चॅटजीपीटीच्या अकल्पनीय यशानंतर गूगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा (पूर्वीचे ‘फेसबुक’), अॅमेझॉन आदी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या नित्यनेमाने वि.भा. प्रारूपे प्रस्तुत करत आहेत. यांमध्ये ओपनएआयची ‘जीपीटी’ मालिका, गूगलचे ‘जेमिनी’, मायक्रोसॉफ्टचे ‘को-पायलट’ आणि अॅन्थ्रोपिक कंपनीचे ‘क्लॉड’ लोकप्रिय आहेत. यांपैकी काही विनाशुल्क आहेत. त्यांना मराठीतूनही प्रश्न विचारता येतात. प्रारूपाकडून प्रतिसाद मिळवण्यासाठी त्याला ‘लघुसूचना (प्रॉम्प्ट)’ द्यावी लागते. वि.भा. प्रारूपे भाषेच्या आकलनासह भाषेशी संबंधित अनेक कार्ये करू शकतात, उदाहरणार्थ, कविता, कथा, पटकथा, पत्रे, ईमेल इत्यादी प्रकारचा मजकूर तयार करणे, सारांश काढणे, भाषांतर करणे, आणि वापरकर्त्यांच्या प्रश्नांची (जरी ते आव्हानात्मक किंवा विचित्र असले तरी) माहितीपूर्ण प्रकारे उत्तरे देणे.

डॉ संजीव तांबे

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal what are the major language formats amy