कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तीन पायऱ्यांपैकी अखेरची पायरी आहे ‘परिपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता’. इंग्रजीमध्ये तिला आर्टिफिशिल सुपर इंटेलिजन्स (एएसआय) म्हणतात. मानवी बुद्धिमत्तेला विचार करण्यास किंवा पार पाडण्यास दुरापास्त असलेली कामे परिपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपट, कथा-कादंबऱ्यांमध्ये अनेकदा परिपूर्ण बुद्धिमान यंत्रणा दाखवलेली असते. माणसाला समजून घेणारी, प्रसंगी त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी, माणसापेक्षा श्रेष्ठ अशी बुद्धिमत्ता ही माणसाचीच कल्पना आहे हे विशेष! माणसाइतकी सक्षम व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता अद्याप अस्तित्वात यायची आहे. अशा वेळी परिपूर्ण बुद्धिमत्तेचा विचार कसा काय होऊ शकतो? पण आज ना उद्या याबाबतीत व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढे जाण्याची शास्त्रज्ञांची मनीषा आहे. आपण विश्वातली काही कोडी सोडवली असली तरी कित्येक गोष्टी अजून उलगडायच्या आहेत. त्यात परिपूर्ण बुद्धिमत्तेची मदत होईल या विश्वासाने शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.

परिपूर्ण बुद्धिमत्ता शक्य असेल तर ती कशी असेल? तिच्याकडे अनेक ठिकाणांहून माहिती मिळवून ती समजून घेण्याची आकलनशक्ती असेल. माणूस ज्ञानेंद्रियांकडून रंग, गंध, यांचे ज्ञान मिळवतो, त्याच धर्तीवर तिला संवेदकांकडून आलेल्या माहितीची जोड असेल. ती प्रश्नाची उकल करण्यासाठी संदर्भ उमजून घेईल. माणूस वापरतो तशी सामाजिक कौशल्ये वापरेल. तिला स्व-जाणीव असेल, इच्छा, आशा-आकांक्षादेखील असतील. आणि अर्थात सर्जनशीलता, म्हणजे कल्पनाशक्तीच्या जोरावर काही वेगळा विचार करून नवनिर्मिती करण्याची क्षमता असेल.

परिपूर्ण बुद्धिमत्ता कधी शक्य होईल यावर मतमतांतरे आहेत. ‘‘परिपूर्ण बुद्धिमत्तेच्या आधी माणूस तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वत:ची बुद्धिमत्ता वाढवून घेईल, मग तिची गरज पडणार नाही,’’ असे मत काही शास्त्रज्ञ मांडतात. ‘‘यंत्रांना परिपूर्ण बुद्धिमत्ता देण्यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये विकास होणे आवश्यक आहे आणि त्याला खूप काळ लागेल,’’ असे अन्य काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

पण तंत्रज्ञानाची प्रगती पाहता तो दिवस दूर नाही, असे काही तज्ज्ञांना वाटते. विविध संवेदकांद्वारे कितीतरी प्रकारची माहिती आता तात्काळ मिळवता येते. क्वान्टम कम्प्युटिंग ही शाखा झपाटय़ाने विकसित होत आहे. त्यामुळे माहितीवर वेगाने प्रक्रिया करणे आवाक्यात येऊ घातले आहे. क्लाउड कम्प्युटिंगचा वापर करत प्रणालींना प्रचंड प्रमाणात स्मृतीक्षमता उपलब्ध करून देता येईल. या साऱ्यांचा समर्थपणे वापर करू शकेल अशा परिपूर्ण बुद्धिमान प्रणालीसाठी तंत्रज्ञानात नवनवीन संशोधन सुरू आहे.

डॉ. मेघश्री दळवी, मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal what would perfect intelligence be like amy
Show comments