भारतीय द्वीपकल्पातील सर्व प्रमुख नद्या पूर्ववाहिनी आहेत आणि त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. अपवाद आहे तो फक्त नर्मदा आणि तापी या दोन प्रमुख नद्यांचा. त्या मात्र पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यातली नर्मदा नदी ही नर्मदा परिक्रमेमुळे सर्वांना सुपरिचित आहे. ती मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांमधून वाहते, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून ती ४० किलोमीटर वाहते. ती रेवा, अमरजा, रुद्रकन्या या नावांनीदेखील ओळखली जाते. मध्य प्रदेशात अमरकंटक येथे उगम पावून गुजरातमध्ये भरुचजवळ खंबायतच्या आखातास मिळते. तिच्यावर कपिलधारा, धुवाधार, सहस्राधारा असे प्रसिद्ध धबधबे आहेत. भारतातील अनेक नद्यांपैकी फक्त नर्मदेची परिक्रमा केली जाते.

तापी नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. सातपुडा पर्वतात मुलताईजवळ उगम पावून महाराष्ट्रातून पुढे जात ती सुरतजवळ अरबी समुद्राला मिळते. तिच्या चौदा प्रमुख उपनद्या असून तिच्यावर अनेक कुंड आहेत.

भारतीय द्वीपकल्पातल्या सर्वच महत्त्वाच्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. मग याच दोन प्रमुख नद्या त्याला का अपवाद आहेत? त्याचे कारण इथल्या भूभागाच्या प्राचीन इतिहासात दडले आहे. अतिप्राचीन काळात भूगर्भातल्या हालचालींमुळे या भागातल्या पाषाणांना नैऋत्य-ईशान्य अशा लांब समांतर भेगा पडल्या आणि त्यातला काही भाग खचल्याने सरळ आणि लांबलचक खचदऱ्या निर्माण झाल्या. या खचदऱ्यांतून या दोन्ही नद्या मार्गस्थ होतात. या भूवैज्ञानिक संरचनेचा प्रभाव नद्यांच्या प्रवाहाची दिशा नियंत्रित करतो. त्यामुळे या नद्या पश्चिमेकडे वाहतात.

या दोन नद्यांचे आणखीही एक वैशिष्ट्य आहे. पूर्ववाहिनी नद्यांप्रमाणे त्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले नाहीत, तर त्या थेटपणे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. बंगालच्या उपसागराकडे वाहणाऱ्या महत्त्वाच्या नद्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्यांची लांबी लक्षणीय आहे. त्या मुख्य नद्यांमध्ये प्रचंड गाळ आणून टाकतात. शिवाय ज्या उतारावरून या नद्या वाहतात तो खूपसा सौम्य आहे. त्यामुळे नद्या मंद गतीने वाहतात. गाळ वाहून नेण्यासाठी नद्यांना पुरेसा वेळ मिळतो, म्हणून त्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाले आहेत. नर्मदा आणि तापी खचदऱ्यांतून वाहतात. त्यांची खोरी अरुंद आहेत. म्हणून त्यांच्या उपनद्यांची लांबी किरकोळ आहे. या उपनद्या नर्मदा आणि तापी या नद्यांमधे कमी गाळ आणतात. म्हणून त्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले नाहीत.

डॉ. योगिता पाटील, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal why only two rivers flow west amy