वूड्स होल समुद्रशास्त्र संस्थेचे ‘अरान मुनी’ हे ध्वनीविषयक काम करणारे जीवशास्त्रज्ञ, प्रवाळ भित्तिकेचे आरोग्य आणि स्थिती तपासण्यासाठी गेल्या दशकापासून ध्वनीचा वापर करत आहेत. प्रवाळाची डिंबके रीफ तयार झाल्यावर आधाराशी संलग्न होऊन राहतात. मात्र वाळूच्या कणापेक्षाही लहान आकाराच्या डिंबक अवस्थेत ती स्वैर पोहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘चर्प, ग्रंट, स्नॅप’ असे आवाज काढणारे रीफमधील मासे आणि कोळंब्याही आढळतात. ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आवाजांची निर्मिती करतात. हे प्रवाळजीव या आवाजाने आकृष्ट होऊन रीफवर आधारासाठी उतरतात. एखाद्या रीफमधून येणाऱ्या आवाजावरून त्या रीफची स्थिती उत्तम आहे की त्याची हानी झाली आहे, हे ओळखता येते. त्यावरून अशा रीफचा आधार घ्यायचा की नाही, हे डिंबके ठरवतात.

हेही वाचा >>> कुतूहल: बहुविध धातूंचे गोळे

निरोगी रीफमधून निघणाऱ्या आवाजाचे ध्वनिमुद्रण करून प्रवाळ डिंबकांना आपल्याला हव्या त्या पृष्ठभागावर उतरवण्यात येते. अशा रीफजवळील स्पीकरमधून आवाज ऐकवून डिंबकांना आमंत्रण दिले जाते. या ‘साउंडस्केप’ पद्धतीत पाण्याच्या तळाला टिकेल अशी अकुस्टिक एन्हान्समेंट व्यवस्था तयार करण्यात आली. तरंगणाऱ्या तराफ्याला स्पीकर, सौर पॅनल लावून ध्वनिमुद्रित मायक्रो-एसडी चीप लावली गेली. हे आवाज मानवी कान ऐकू शकत नाहीत, मात्र डिंबकांना ते समजतात. २०२२ च्या उन्हाळय़ात ‘नेज आकी’ या विद्यार्थिनीने अमेरिकेतील व्हर्जिन बेटावर सेंट जॉन येथे हा प्रयोग सुरू केला. ‘मस्टर्ड-हिल प्रवाळ’ या प्रजातीचे नमुने त्यांनी अंडी घालेपर्यंत प्रयोगशाळेत सागरी जलाच्या टाक्यांत ठेवून त्यांच्यापासून डिंबक होईपर्यंत वाट पाहिली. नंतर त्यांना गोळा करून तीन वेगवेगळय़ा रीफवर सोडले. यातील दोन रीफ नाश पावत होते तर एक निरोगी होते. त्यांच्यापासून १, ५, १० आणि ३० मीटर अंतरावर ध्वनिवर्धक लावण्यात आले होते. आकी यांनी २४, ४८ आणि ७२ तासांनंतर प्रवाळ बाळे कशी स्थिर झाली ते तपासले.

त्यांच्या हे लक्षात आले की आवाजाने आकृष्ट झाल्याने दोन ते तीन पटींनी अधिक संख्येने डिंबके रीफवर स्थापित झाली. साउंडस्केप पार्श्वसंगीताने ती लवकर स्थापित होतात, या अनुमानामुळे शास्त्रज्ञांत उत्साह निर्माण झाला आहे. गोल्फ बॉल प्रवाळावरदेखील असेच प्रयोग केले असता हेच अनुमान निघाले. आता प्रवाळ संवर्धनासाठी असे प्रयोग केले जातील.

– डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal woods hole oceanographic institution future of ocean research zws