जगभरात आजच्या तारखेस ४९ वा ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा होतो आहे. हा दिवस ‘पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन’ याकरिता कटिबद्ध होण्यासाठी जगातील सर्व नागरिकांना प्रेरणा देणारा, त्यांना संवेदनशील करणारा आणि जागृत करणारा असावा असे संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या ‘मानवी पर्यावरण परिषदे’त ठरले. ही परिषद १९७२ साली स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या शहरात ५ जून ते १६ जून अशी दहा दिवस भरविण्यात आली. मानव, निसर्ग व पर्यावरण यांचे दुरावत चाललेले नातेसंबंध पुन्हा सुरळीत कसे करता येतील यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी जगातील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने भरवलेली ही पहिलीच परिषद आणि म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेली. या ऐतिहासिक परिषदेचे स्मरण म्हणून दरवर्षी ‘५ जून’ हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव या परिषदेत करण्यात आला.
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत या वर्षी ठरवण्यात आलेली मध्यवर्ती संकल्पना सागरी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘प्लास्टिकच्या गैरवापरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे होत असलेल्या घातक प्रदूषणावर मात करणे’ ही आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याचा घातक परिणाम जगभरातील सागरी परिसंस्थांवर होतो आहे. समुद्रात तरंगत असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू आणि त्यात अडकलेले समुद्री पक्षी, प्राणी आपण प्रत्यक्ष किंवा छायाचित्रांमध्ये बघतो. अनेक प्रसंगी या प्राण्यांच्या जिवावर बेतल्याची उदाहरणे समोर येतात. या शिवाय विविध मार्गानी शेवटी समुद्रात पोहोचलेल्या या प्लास्टिकच्या वस्तूंचे लाटांच्या तडाख्यांनी, सूर्य किरणांच्या उष्णतेने आणि समुद्राच्या क्षारतेने सूक्ष्म कणांत (मायक्रोप्लास्टिक) रूपांतर होते. हे सूक्ष्म कण पुढे अन्नसाखळीतून मानवी शरीरात प्रवेश करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी आपण आपल्या स्वत:पासून सुरुवात करू या. वैयक्तिक पातळीवर प्लास्टिकचा कचरा निर्माण होऊ देणार नाही आणि मी स्वत: प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार नाही आणि माझ्यासमोर खाडीत, नदीत, समुद्रात जर कोणी प्लास्टिकचा कचरा टाकताना दिसला तर मी होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता त्या व्यक्तीला असे करण्यापासून कायदेशीरपणे प्रतिबंध करेन, असा दृढ निश्चय करून याची अंमलबजावणी करू या!
– डॉ. संजय जोशी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org