महासागर म्हटले की त्यासोबत मत्स्यसंपदा येतेच. या सजीव संपदेचे आणि तिच्याशी निगडित व्यवसायांचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक मासेमारी (मत्स्यिकी) दिन साजरा केला जातो. २१ नोव्हेंबर १९९७ रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय मच्छीमार संघटनेमार्फत आयोजित ‘वल्र्ड फोरम ऑफ फिश हार्वेस्टर्स अँड फिश वर्कर्स’चे उद्घाटन झाले. त्यानिमित्ताने २०१५ पासून प्रतिवर्षी हा दिन त्याच दिवशी साजरा होतो. मत्स्यव्यवसायातील दुर्लक्षित घटकांना मदत करणे आणि मत्स्यसंपदा स्थायी रूपात वृद्धिंगत करण्यासाठी योजना आखून ती अमलात आणणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे; ज्यासाठी पहिल्या अधिवेशनात ‘वल्र्ड फिश फोरम’ स्थापन केले गेले. २०२३ सालचे घोषवाक्य आहे, ‘स्वास्थ्यपूर्ण महासागरी परिसंस्थांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक स्तरावरील मत्स्यसाठे-शाश्वततेची हमी राखणे.’ मासेमारी हा पारंपरिक, प्राचीन उद्योग आहे. या व्यवसायात जगभर अंदाजे सहा कोटी लोक सहभागी आहेत.
हेही वाचा >>> कुतूहल : मत्स्याहार
साडेअठरा कोटी मेट्रिक टन उत्पादन, पंधराशे कोटी अमेरिकन डॉलर्स ही २०२३ची अंदाजे उलाढाल आहे. प्रतिवर्षी सहा ते सात टक्के वाढ अपेक्षित आहे. अनेक उत्पादनांच्या तुलनेत ही वाढ प्रचंड आहे. तरीही हे क्षेत्र व यातील व्यक्ती, उत्पादिते व संसाधनांचे महत्त्व नगण्य आहे. प्रदूषण, हवामान बदल, भराव घालणे, वाढत्या लोकसंख्येचा रेटा यामुळे जलस्रोतांना गंभीर धोका निर्माण होत आहे. यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जनजागृती अत्यावश्यक ठरते. आपल्या देशापुरते बघितल्यास, स्वास्थ्यपूर्ण वातावरणाचा अभाव ही प्रमुख समस्या आहे. यामुळे मोठया प्रमाणावर उत्पादन होऊनही निर्यातमूल्य नाही. हा दिवस साजरा करताना प्रशासन, स्थानिक जनता यांना मच्छीमार समाजाशी जोडून देणे; त्यांचे प्रश्न समाजापर्यंत पोहोचवणे, त्यांची उत्तरे शोधण्याची मानसिकता तयार करणे ही आव्हाने पेलायला हवीत. २१ नोव्हेंबरला जागतिक मत्स्यिकी दिनानिमित्त अनेक सांस्कृतिक- वैचारिक कार्यक्रम आयोजित केले जातात. चर्चासत्रे, कार्यशाळा यांतून जगाला या क्षेत्रातील कामाची, त्यात कार्यरत व्यक्तींच्या खडतर व साहसी जीवनशैलीची ओळख करून दिली जाते. गरज आहे ती सामान्य जनता व प्रशासनाने सक्रिय सहभागी होण्याची. जर संशोधक, अभ्यासक यांनी मत्स्यव्यावसायिक व संबंधितांना त्यांच्या संशोधन-अभ्यासाद्वारे प्रश्नांची उकल करण्यास मदत केली तर त्यांचा हा वाटा मोलाचा ठरू शकतो.
यात एक सामान्य नागरिक म्हणून प्रदूषणात भर न घालणे, परिसर स्वच्छ ठेवणे, मच्छीमार समाज व व्यवसाय यांचा योग्य आदर करणे, त्यांना सन्मान देणे अशा मार्गानी आपण भूमिका घेतली पाहिजे.
– डॉ. प्रसाद कर्णिक
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org